ऑनलाईन टीम / नांदेड :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. संपूर्ण देशात खबरदारी म्हणून लॉक डाऊन देखील जारी करण्यात आले आहे. मात्र, लोकांना याची जाणीव होण्यास वेळ लागत आहे. याचा प्रत्यय देणारी घटना नांदेडमध्ये घडली आहे. नांदेडमधील एका माणसामुळे संपूर्ण गावावर कोरोनाची टांगती तलवार उभी राहिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील काटकळंबा गावातील एका व्यक्तीने मुलगा झाला या खुशीत गावात पेढे वाटले. मात्र हाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे गावातील 116 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संबंधित 24 वर्षीय व्यक्ती औरंगाबादमधील एका कंपनीत कामाला आहे. 4 जुलै रोजी मुलगा झाला म्हणून पाहण्यासाठी तो नांदेडमधील कंधार तालुक्यातील गावाकडे आला. आपल्या मुलाला पातंरड येथे भेटला आणि गावाकडे परतला. त्याच्या कुटुंबात आई-वडील, भाऊ बहीण आहेत. दोन दिवसात तो गावातच आजोळी मामा-मामीलाही भेटला. मुलगा झाल्याच्या आनंदात त्याने गावात, मित्र मंडळीत पेढे वाटले. मात्र या तरुणाला कोरोनाची बाधा झाली असल्याचे कळताच गावाची झोपच उडाली आहे.
दरम्यान, प्रशासनाने खबरदारी म्हणून पूर्ण परिसर सील केला आहे. तर त्याच्या संपर्कात आलेल्या 116 जणांना होम क्वारंटाइन केले आहे. तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावामध्ये निर्जंतुकीकरण करण्याचं काम तातडीने चालू केलं आहे. गावात भीतीचं वातावरण पसरु नये यासाठी जनजागृती देखील करण्यात येत आहे.