सौंदर्यवृद्धीसाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो. या मातीपासून फेसपॅक तयार केले जातात. त्वचा तेलकट असो किंवा कोरडी…मुलतानी माती प्रत्येक प्रकारच्या त्वचेच्या समस्या दूर करू शकते. मुलतानी मातीमुळे चेहर्यावरील मुरूमं, पुटकुळ्या, सुरकुत्या कमी होतात. शिवाय रंगही उजळतो. म्हणूनच ही माती प्रत्येकीने वापरायला हवी. त्वचेच्या प्रकारानुसार मुलतानी मातीचा वापर कसा करायचा याविषयी…
तेलकट त्वचा असल्यास एक कप मुलतानी माती आणि दोन चमचे गुलाब पाणी घ्या. हे दोन्ही घटक एकत्र करून पॅक तयार करा. हा पॅक चेहरा व मानेला लावून साधारण पंधरा मिनिटं वाळू द्या. मग थंड पाण्याने धुवून टाका. यामुळे त्वचा उजळ दिसेल. शिवाय त्वचेचा तेलकटपणाही कमी होईल.
सामान्य त्वचेसाठी पॅक तयार करताना प्रत्येकी एक चमचा चंदन पावडर आणि मुलतानी माती घ्या. त्यात एक छोटा चमचा कच्चं दूध घाला. सर्व घटक एकत्र करा. आता हा पॅक चेहरा आणि मानेला लावून 20 मिनिटं ठेवा. मग धुवून टाका. आठवडय़ातून दोन वेळा हा पॅक लावा. यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतील.
कोरडय़ा त्वचेसाठी दोन चमचे मुलतानी माती, एक चमचा कच्चं दूध आणि दोन बदाम घ्या. बदाम कुटून किंवा किसून घ्या. एका वाटीत मुलमानी माती, बदाम आणि दूध घालून पॅक तयार करा. हा पॅक पाच मिनिटं बाजूला ठेवा. मग हा पॅक चेहर्याला लावा. हलक्या हातांनी मसाज करा. बदामामुळे त्वचेचं स्क्रबिंग होईल. वाळल्यावर धुवून टाका. हा पॅक आठवडय़ातून दोन वेळा लावल्यास त्वचेचा कोरडेपणा आणि त्यामुळे उद्भवणार्या समस्याही कमी होतात. मुलतानी मातीचे हे पॅक नक्की लावून बघा.