लॉकडाऊन नियमांना तिलांजली
ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातील बदायू जिह्यात मौलवी टोलामध्ये मुस्लिम धर्मगुरु अब्दुल हमीद मुहम्मद सालिमुल कादरी यांचे रविवारी निधन झाले. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी उत्तरप्रदेशात लॉकडाउन जाहीर केला असून, अंत्यसंस्कारासाठी फक्त 20 जणांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी आहे. मात्र, तरी देखील या धर्मगुरुंच्या अंत्ययात्रेसाठी 15 ते 20 हजार लोकांनी हजेरी लावत कोरोना नियमांना तिलांजली दिली. या प्रकाराबद्दल सोमवारी रात्री पेलिसांनी अज्ञातांवर एफआयआर दाखल केला आहे.
बदायूमधील एका मशीदीत अब्दुल हमीद मुहम्मद सालिमुल कादरी यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्यावेळी उत्तरप्रदेशच्या वेगवेगळ्या भागातून लोक या धर्मगुरुंच्या अंत्यदर्शनासाठी जमले. लोकांना कोरोना नियमावलीचा विसर पडला. हळूहळू या अंत्ययात्रेत 15 ते 20 हजार लोक जमले. अनेकांनी मास्क देखील घातला नव्हता. या अंत्ययात्रेचा व्हिडिओ समोर आला असून, पोलिसांनी अज्ञातांवर आयपीसी कलम 188 सह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.