२६ सप्टेंबर १७१५ : अंबाबाई मंदिराच्या वैभवशाली इतिहासातील सुवर्णक्षण : शंभू छत्रपतींच्या आदेशानुसार धार्मिक विधी
संग्राम काटकर / कोल्हापूर
शनिवार २६ सप्टेंबर २०२० या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीला श्रीमंत सिदोजी घोरपडे-सरकार यांचे वंशज यशराज घोरपडे यांनी अभिषेक घातला आणि करवीर संस्थानच्या वैभवशाली इतिहासातील एका सुवर्णक्षणाच्या स्मृतींना, आठवणींना उजाळा मिळाला. परकीय आक्रमकांपासून संरक्षण करण्यासाठी लपवून ठेवलेल्या अंबाबाईच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना विजयादशमी दिवशी २६ सप्टेंबर १७१५ रोजी झाली होती. त्याआधी अंबाबाईची मूर्ती कपिलतीर्थातील एका पुजाऱ्याच्या घरी सुरक्षित ठेवण्यात आली होती. तत्कालिन शंभू छत्रपती (दुसरे) (शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे सुपुत्र) यांनी दिलेल्या आदेशानुसार धार्मिक विधी, कार्यक्रम पार पाडत अंबाबाईची मूर्ती मंदिरातील गाभाऱ्यात विराजमान करण्यात आली होती. तीन शतकांपूर्वीच्या या ऐतिहासिक घटनेला कोल्हापूरच्या इतिहासात अनन्यसाधरण महत्व आहे.
अंबाबाईचे प्राचीन मंदिर आणि त्यातील अंबाबाईची मूर्ती यांचे कोल्हापूरच्या इतिहासात विशेष महत्व आहे. या मंदिरावर प्राचीन आणि अर्वाचिन काळात काही आक्रमणे झाली. मात्र त्याचे मोठे पुरावे मिळत नाहीत. शिवकाळापूर्वी पातशाहांची आक्रमणे मराठी मुलाखात झाली. शिवकाळात आणि नंतर मात्र आक्रमणे कमी झाली. तत्कालिन राजकीय संघर्ष, त्यातून निर्माण होणारी स्थिती, आक्रमणाची भीती यातून मंदिर आणि त्यातील मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी भाविक आणि पुजारी चिंतेत असत. अंबाबाई मंदिराबाबतही अशी भीती निर्माण झाली होती. तेंव्हा पुजाऱयांनी अंबाबाईच्या मूर्तीला धोका निर्माण होऊ नये, यासाठी ती मंदिरालगतच्या कपिलतीर्थ येथील एका पुजाऱ्याच्या घरी लपवून ठेवली होती. २६ सप्टेंबर १७१५ या विजयादशमीच्या दिवशी तत्कालिन श्रीमन्महाराज शंभू छत्रपती (दुसरे) (शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे सुपुत्र) यांनी दिलेल्या आदेशानुसार अंबाबाईच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना झाली. या घटनेला ३०५ वर्षे झाली. अंबाबाई मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना करण्याआधी किती वर्षे लपवून ठेवण्यात आली या विषयी फारशी माहिती उपलब्ध नसली तरी अनेक वर्षे ही मूर्ती लपवून ठेवण्यात आल्याचे पूर्वीचे काही जाणकार सांगत असल्याची माहिती इतिहास संशोधक देतात.
पुनर्प्रतिष्ठापनेचा सुवर्णक्षण आणि स्मृती
अंबाबाईच्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेबद्दल मंदिर मूर्तीशास्त्र अभ्यासक सांगतात, १७१० साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा छत्रपती महाराणी ताराराणी यांनी करवीर संस्थानची स्थापना केली. त्यानंतर १७१५ साली नरहरभट सावगावकर यांना देवीचा दृष्टांत झाला. आता मला पुन्हा सिंहासनावर म्हणजेच मंदिरात विराजमान करा असा हा दृष्टांत होता. सावगावकर यांनी दृष्टांताची माहिती तत्कालिन शंभू छत्रपती (दुसरे) यांना सांगितली. त्यानंतर शंभू छत्रपतींच्या हुकुमावरून श्रीमंत सिदोजी घोरपडे सरकार यांनी २६ सप्टेंबर १७१५ दिवशी साजऱया झालेल्या विजया दशमीदिशी अंबाबाईची मूर्ती पुन्हा मंदिरात विराजमान केली. आज (शनिवारी २६ सप्टेंबर २०२० रोजी) या ऐतिहासिक घटनेला ३०५ वर्षे पूर्ण झाली.
घोरपडेंच्या वंशजाला मान
अंबाबाई मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेच्या या ऐतिहासिक घटनेला कोरोना संकटामुळे साध्या पद्धतीने उजाळा देण्यात आला. श्रीमंत सिदोजी घोरपडे-सरकार यांचे आजचे वंशज यशराज घोरपडे यांच्या हस्ते अंबाबाईच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव यांच्या हस्ते श्रीमंत यशराज घोरपडे, गजेंद्रगडकर सरकार, सावगावकर प्रधान यांचे प्रतिनिधी विशाल प्रधान व श्रीपूजक माधव मुनीश्वर, शिरीष मुनीश्वर यांचा सन्मान करण्यात आला. मंदिर मूर्तीशास्त्र अभ्यासक ऍड. प्रसन्न विश्वंभर मालेकर यांनी अंबाबाई मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना दिवसाचे महत्त्व सांगितले. दरम्यान मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना दिवसाचे औचित्य साधून अंबाबाईची सालंकृत विशेष पूजा बांधली होती. तसेच संपूर्ण मंदिर फुलांनी व रांगोळी यांनी सजविले होते. यावेळी अंबाबाई मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, मिलिंद घेवारी, सुयश पाटिल, गणेश नेर्लेकर उपस्थित होते.

२६ सप्टेंबर हा दिवस सण म्हणून साजरा व्हावा.
२६ सप्टेंबर १७१५ या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई मूर्तीची मंदिरात झालेली पुनर्प्रतिष्ठापना ही घटना एका अर्थाने स्वराज्याच्या सन्मानात एक मानाचा तुरा रोवणारी ठरली आहे. त्यामुळे २६ सप्टेंबर हा दिवस अंबाबाईच्या भक्तांनी एक सण म्हणूनच साजरा करावा.
ऍड. प्रसन्न मालेकर (मंदिर मूर्तीशास्त्र अभ्यासक)

अंबाबाई मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेला शनिवारी ३०५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने श्रीमंत सिदोजी घोरपडे-सरकार यांचे वंशज यशराज घोरपडे यांच्या हस्ते अंबाबाईला अभिषेक केला. यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, गजेंद्रगडकर सरकार, सावगावकर प्रधान यांचे प्रतिनिधी विशाल प्रधान व श्रीपूजक माधव मुनीश्वर व शिरीष मुनीश्वर आदी उपस्थित होते.