आयपीएल साखळी फेरीत साकारला सलग तिसरा विजय
चेन्नई / वृत्तसंस्था
ग्लेन मॅक्सवेल (49 चेंडूत 78), एबी डीव्हिलियर्स (34 चेंडूत नाबाद 76) यांनी गोलंदाजांवर तुटून पडण्याची ‘ट्रिक’ यशस्वीरित्या अमलात आणल्यानंतर आरसीबीने केकेआरचा आयपीएल साखळी सामन्यात 38 धावांनी धुव्वा उडवला आणि या मोसमातील सलग तिसऱया यशश्रीसह विजयाची स्वप्नवत हॅट्ट्रिक नोंदवली. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर 20 षटकात 4 बाद 204 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात केकेआरला 20 षटकात 8 बाद 166 धावांवर समाधान मानावे लागले.
आरसीबीने द्विशतकी मजल गाठली, त्याचे मॅक्सवेल, डीव्हिलियर्स हेच मुख्य शिल्पकार ठरले. मॅक्सवेलच्या खेळीत 9 चौकार व 3 उत्तुंग षटकार तर डीव्हिलियर्सच्या खेळीत देखील 9 चौकार व 3 षटकारांचाच समावेश राहिला. वास्तविक, लेगब्रेक गोलंदाज वरुण चक्रवर्तीने कर्णधार कोहली (5) व रजत पाटीदार (1) यांना दुसऱया षटकात बाद करत आरसीबीची प्रारंभीच 2 बाद 9 अशी दैना उडवली होती. अनुभवी हरभजनने आपली दोन षटके नियंत्रित टप्प्यावर टाकत आरसीबीच्या अडचणीत आणखी भर टाकली. मात्र, मॅक्सवेलने प्रारंभी देवदत्त पडिक्कलसह (25) तिसऱया गडय़ासाठी 86 धावांची भागीदारी साकारली आणि देवदत्त बाद झाल्यानंतर डीव्हिलियर्सच्या साथीने एमए चिदंबरम स्टेडियमवरील या लढतीत बडय़ा फटक्यांची अक्षरशः आतषबाजी केली.
बहरातील मॅक्सवेलने सर्वप्रथम शकीब हसनला लाँगऑनच्या दिशेने आपल्या डावातील पहिल्या षटकारासाठी पिटाळून लावले आणि इथून तो केकेआरच्या गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडत राहिला. चक्रवर्ती व हरभजन नियंत्रित मारा करत असताना मॉर्गनने अचानक त्यांची गोलंदाजी काढून घेतली. पण, आरसीबीने या आश्चर्यकारक चालीचा उत्तम लाभ घेत चौफेर फटकेबाजी साकारली. पहिल्या पॉवरप्लेमध्ये 2 बाद 45 अशी स्थिती असताना तिथून मॅक्सवेलने फलंदाजीचा गियर बदलला आणि यानंतर आरसीबीला अजिबात मागे वळून पहावे लागले नाही.
ड्रेसिंगरुममधील तुफान मैदानात!
प्रसिद्ध कृष्णाने देवदत्तला बाद करत 86 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. पण, त्यावेळी खरे तुफान तर जणू ड्रेसिंगरुममध्ये बसले होते, ते मैदानावर अवतरले. डीव्हिलियर्सने प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केल्यानंतर मॅक्सवेलही आणखी तुटून पडत राहिला आणि या जोडीने आरसीबीला सहजपणे 200 धावांच्या उंबरठय़ावर नेले. मॅक्सवेल चौथ्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला, त्यावेळी आरसीबीने 17 षटकात 4 बाद 148 धावांची मजल गाठली होती. उर्वरित 3 षटकात त्यांनी चक्क 56 धावांची आतषबाजी केली.
केकेआर विजयापासून दूरच
विजयासाठी 205 धावांचे आव्हान असताना केकेआरचा संघ विजयाच्या अगदी आसपास देखील फिरकू शकला नाही. सातव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या आंद्रे रसेलने 20 चेंडूत सर्वाधिक 31 धावांचे योगदान दिले. नितीश राणा (18), शुभमन (21), राहुल त्रिपाठी (25), मॉर्गन (29), दिनेश कार्तिक (2), शकीब हसन (26) ठरावीक अंतराने बाद होत राहिले आणि पाहता पाहता केकेआरचा डाव कोसळत राहिला. अंतिमतः त्यांना 20 षटकात 8 बाद 166 धावांवर समाधान मानावे लागले.
आरसीबीतर्फे काईल जेमिसनने 41 धावात 3 तर हर्षल पटेल (2-17), यजुवेंद्र चहल (2-34) यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. एबी डीव्हिलियर्स सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
धावफलक
आरसीबी ः विराट कोहली झे. त्रिपाठी, गो. वरुण 5 (6 चेंडूत 1 चौकार), देवदत्त पडिक्कल झे. त्रिपाठी, गो. प्रसिद्ध कृष्णा 25 (28 चेंडूत 2 चौकार), रजत पाटीदार त्रि. गो. वरुण 1 (2 चेंडू), ग्लेन मॅक्सवेल झे. हरभजन, गो. कमिन्स 78 (49 चेंडूत 9 चौकार, 3 षटकार), एबी डीव्हिलियर्स नाबाद 76 (34 चेंडूत 9 चौकार, 3 षटकार), काईल जेमिसन नाबाद 11 (4 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार). अवांतर 8. एकूण 20 षटकात 4 बाद 204.
गडी बाद होण्याचा क्रम
1-6 (विराट, 1.2), 2-9 (रजत, 1.6), 3-95 (देवदत्त, 11.1), 4-148 (मॅक्सवेल, 16.6).
गोलंदाजी
हरभजन सिंग 4-0-38-0, वरुण चक्रवर्ती 4-0-39-2, शकीब हसन 3-0-24-0, पॅट कमिन्स 4-0-34-1, प्रसिद्ध कृष्णा 4-0-31-1.
केकेआर ः नितीश राणा झे. पडिक्कल, गो. चहल 18 (11 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), शुभमन गिल झे. बदली खेळाडू (ख्रिस्तियन), गो. जेमिसन 21 (9 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), राहुल त्रिपाठी झे. सिराज, गो. वॉशिंग्टन 25 (20 चेंडूत 5 चौकार), इयॉन मॉर्गन झे. कोहली, गो. पटेल 29 (23 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), दिनेश कार्तिक पायचीत गो. चहल 2 (5 चेंडू), शकीब हसन त्रि. गो. जेमिसन 26 (25 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), आंद्रे रसेल त्रि. गो. पटेल 31 (20 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), पॅट कमिन्स झे. डीव्हिलियर्स, गो. जेमिसन 6 (2 चेंडूत 1 षटकार), हरभजन सिंग नाबाद 2 (2 चेंडू), वरुण चक्रवर्ती नाबाद 2 (3 चेंडू). अवांतर 4. एकूण 20 षटकात 8 बाद 166.
गडी बाद होण्याचा क्रम
1-23 (शुभमन, 1.5), 2-57 (राहुल त्रिपाठी, 5.6), 3-66 (नितीश राणा, 6.5), 4-74 (दिनेश कार्तिक, 8.3), 5-114 (मॉर्गन, 13.4), 6-155 (शकीब हसन, 17.4), 7-161 (कमिन्स, 17.6), 8-162 (आंद्रे रसेल, 19.1).
गोलंदाजी
मोहम्मद सिराज 3-0-17-0, काईल जेमिसन 3-0-41-3, यजुवेंद्र चहल 4-0-34-2, वॉशिंग्टन सुंदर 4-0-33-1, ग्लेन मॅक्सवेल 2-0-24-0, हर्षल पटेल 4-0-17-2.
आरसीबीने शेवटच्या 3 षटकात तब्बल 56 धावा कुटल्या!
प्रथम फलंदाजी करताना डीव्हिलियर्सचा मास्टरक्लास व मॅक्सवेलचा काऊंटर-ऍटॅक हे आरसीबीच्या डावाचे ठळक वैशिष्टय़ ठरले. आरसीबीने आपल्या शेवटच्या 3 षटकात तब्बल 56 धावांची आतषबाजी केली आणि यात डीव्हिलियर्सची फटकेबाजी लक्षवेधी ठरली. आरसीबीने त्याच्या फटकेबाजीमुळेच शेवटच्या षटकात 21 धावा वसूल केल्या.
बॉक्स
पर्पल कॅप आरसीबीकडे, ऑरेंज कॅप आरसीबीकडे, गुणतालिकेत अव्वलस्थानही आरसीबीकडेच!
रविवारी दिवसभरातील पहिला सामना संपन्न झाल्यानंतर आरसीबी यंदाच्या मोसमात विजयाची हॅट्ट्रिक साकारणारी पहिली टीम ठरली. शिवाय, ऑरेंज कॅप, पर्पल कॅपचा मानही त्यांच्या खेळाडूकडेच राहिला. पहिल्या सामन्याअखेर ऑरेंज कॅपच्या यादीत ग्लेन मॅक्सवेल (3 सामन्यात 176 धावा) तर पर्पल कॅपच्या यादीत हर्षल पटेल (3 सामन्यात 9 बळी) आघाडीवर होते. या मोसमात विजयाची हॅट्ट्रिक नोंदवणारा देखील हाच एकमेव संघ ठरला आहे. 13 वर्षांच्या आयपीएल इतिहासात पहिले सलग तिन्ही सामने जिंकण्याची आरसीबीसाठी ही पहिलीच वेळ आहे.