900 ते 1000 रुपये किंमत : कोव्हॅक्सिन मार्चमध्ये तर कोव्हिशिल्ड सप्टेंबरमध्ये मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्या देशव्यापी लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱया लसी लवकरच सर्वसामान्यांच्या वापरासाठी मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार आहेत. कोव्हॅक्सिन ही लस मार्चपासून मेडिकल स्टोअर्समध्ये मिळू शकते. भारत बायोटेक कंपनीने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. तसेच सप्टेंबरमध्ये सीरम इन्स्टिटय़ूट देखील कोविशिल्डला बाजारात आणू शकते. या लसीची किंमत 900 ते 1000 रुपये असेल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
भारत बायोटेक कोव्हॅक्सिनला 24 मार्चला बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्यावषी याच दिवशी लॉकडाऊन लावण्यात आले होते. सध्या कोव्हॅक्सिनचा पुरवठा कंपनीकडून केवळ सरकारला केला जात आहे. त्यानंतर आता वितरकांशी बैठक घेतल्यानंतर लस साठवण सुविधांची तपासणी केली जात आहे. लवकरच लस बाजारात आणण्याची तारीख निश्चित केली जाईल. बाजारात लस आणण्यासाठी सरकारच्या मंजुरीची गरज नाही. आम्ही पूर्णपणे तयार आहोत, मार्चच्या अखेरीस ही लस बाजारात आणू, असा दावा ‘भारत बायेटेक’ने केला आहे. ‘सीरम’चे विभागीय सेल्स मॅनेजर अजय द्विवेदी यांनीही ऑगस्टपर्यंत आमची लस बाजारात आणली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
दोन ऐवजी एका डोसवर संशोधन
जगभरात कोरोना व्हॅक्सीनचे दोन डोस दिले जात आहेत. यामध्ये दुसरा डोस बूस्टर म्हणून दिला जातोय. मात्र, भारत बायोटेक कोरोना नष्ट करण्यासाठी सिंगल डोसवरही काम करत आहे. तसेच देशातील अन्य पाच-सहा वैद्यकीय कंपन्याही कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करत असून त्यांचे संशोधनही अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या लसी सरकारकडून मिळालेल्या परवानगीनंतरच बाजारात येणार आहेत.
भारत शेजारी देशांना 2 कोटी लस पुरविणार
भारत शेजारी असणाऱया राष्ट्रांना दोन कोटी लस पुरविणार असल्याची माहिती शुक्रवारी सरकारी सूत्रांकडून देण्यात आली. भारतातील पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडल्याची खात्री झाल्यानंतर शेजारी राष्ट्रांना लस पुरवठा करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. भारताच्या लसींना वेगवेगळय़ा राष्ट्रांकडून मागणी वाढत असली तरी भारत प्राधान्याने शेजारील राष्ट्रांना लस पुरविण्यावर भर देणार आहे.