अमेरिकेत मंजुरीसाठी करणार अर्ज – 12-17 वयोगटावर परीक्षण
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
मॉडर्ना या कंपनीने स्वतःच्या लसीचे मुलांवर करण्यात आलेल्या दुसऱया आणि तिसऱया टप्प्यातील परीक्षणाचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. लस मुलांवर 100 टक्के प्रभावोत्पादक आणि सुरक्षित आढळून आल्याचे कंपनीने मंगळवारी सांगितले आहे. हे परीक्षण 12 ते 17 वर्षांच्या वयोगटातील मुलामुलींवर करण्यात आले होते.
परीक्षणात 3732 मुलांना सामील करण्यात आले होते. यात 2,488 मुलांना दोन्ही डोस देण्यात आले होते. दोन्ही डोस देण्यात आलेल्या मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली नाहीत. लसीला मुलांसाठी मंजुरी मिळावी याकरता अमेरिकेतील नियामकीय यंत्रणा एफडीएकडे जून महिन्यात अर्ज करणार असल्याचे मॉडर्नाने सांगितले आहे.
मुलांसाठी दुसरी लस
मॉडर्नाला मंजुरी मिळाल्यास ही अमेरिकेत किशोरवयीनांसाठी उपलब्ध दुसरी लस ठरणार आहे. फेडरल रेग्युलेटर्सने चालू महिन्यात 12-15 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी फायजर-बायोएनटेकच्या लसीला मंजुरी दिली आहे. फायजरच्या लसीला प्रारंभी 16 आणि त्याहून अधिक वय असलेल्या लोकांवर वापरण्यास अनुमती देण्यात आली होती. तर मॉडर्नाची लस 18 आणि त्याहून अधिक वय असलेल्या लोकांना देण्यात येत आहे.
सर्वप्रथम फायजरला मंजुरी
मुलांसाठी मंजुरी मिळविणारी फायजर ही जगातील पहिली कोरोनावरील लस ठरली होती. कॅनडाच्या औषध नियामक हेल्थ कॅनडाने 12-15 वर्षांच्या वयोगटातील मुलांसाठी या लसीला मंजुरी दिली होती. त्यानंतर अमेरिकेतही या लसीला मंजुरी मिळाली आहे.