बिहारच्या मुजफ्फरपूरमधील धक्कादायक घटना
वृत्तसंस्था/ मुजफ्फरपूर
बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. तेथे एका शिबिरात मोफत मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी गेलेल्या अनेक लोकांना दृष्टीच गमवावी लागली आहे. मुजफ्फरपूर नेत्र रुग्णालयात मोफत मोतिबिंदू ऑपरेशन कॅम्प आयोजित करण्यात आले होते. यात शिबिरात 300 हून अधिक रुग्णांच्या डोळय़ांवर उपचार झाले, यातील 26 हून अधिक जणांना एका डोळय़ाची दृष्टी गमवावी लागली. हे प्रकरण समोर आल्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशीचा आदेश दिला आहे.

दुसरीकडे नेत्र रुग्णालयात 26 रुग्णांची एका डोळय़ाची दृष्टी गेल्यावर कुटुंबीयांनी उग्र रुप धारण केल्याने रुग्णालय व्यवस्थापनाने सर्व रुग्णांना घाईगडबडीत उपचाराच्या नावाखाली पाटण्यात पाठविले. तेथे तज्ञ डॉक्टरांनी संसर्ग झाल्याचे सांगत 26 पैकी 4 रुग्णांचा डोळा काढून टाकला. उर्वरित रुग्णांवर देखील हीच वेळ येणार असल्याचे समजते. याप्रकरणी संबंधित खासगी रुग्णालयावर कठोर कारवाई करणार असल्याचे विधान राज्याचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी केले आहे.