इम्रान खान यांच्या विशेष सल्लागाराचा दावा : अंतर्गत राजकारणात भारताला ओढले
इस्लामाबाद/ वृत्तसंस्था
माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे भारताला फितूर झाले आहेत, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सल्लागार शाहबाज गिल यांनी केला आहे. नवाज शरीफ हे पाकिस्तानविरोधी आहेत असे मी म्हणत नाही, परंतु ते छोटी मानसिकता असलेले उद्योजक आहेत. एक पाकिस्तानी व्यापारी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटू शकतो का? पण नवाज यांनी पंतप्रधान असताना काठमांडूमध्ये मोदींची गुपचूप भेट घेतली होती, असा दावा गिल यांनी केला आहे.
तर पाकिस्तानला शरीफ यांच्या विरोधात ब्रिटनमध्ये अजामिनपात्र अटक वॉरंट प्राप्त करण्यास अपयश आले आहे. पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणाशी संबंधित प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू शकत नसल्याचे ब्रिटन सरकारने पाकिस्तानच्या अधिकाऱयांना कळविले आहे.
नवाज यांचे भारताशी व्यापारी संबंध
नवाज शरीफ यांनी अलिकडेच लंडनमधील एका देशाच्या दूतावासात बैठक घेतली होती याची माहिती सरकारला प्राप्त झाली आहे. पठाणकोट येथील हल्ल्यानंत भारताचे उद्योजक सज्जन जिंदाल आणि नवाज यांनी एकसारखी विधाने केली होती. नवाज आणि त्यांच्या परिवारचे भारतीयांशी वैयक्तिक स्तरावर औद्योगिक संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नवाज लंडनमध्ये
नवाज यांच्यावर लंडनमध्ये नोव्हेंबरपासून उपचार सुरू आहेत. लाहोर उच्च न्यायालयाने त्यांना केवळ 4 आठवडय़ांसाठी देशाबाहेर जाण्याची अनुमती दिली होती. न्यायालयाकडून वारंवार समन्स बजावण्यात आल्यावरही नवाज हजर राहिले नाहीत. हे पाहता नवाज यांना फरार घोषित करण्यात आले आहे.