ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तारानंतर आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या जागी मनसुख मांडवीया यांना देशाचे नवीन आरोग्यमंत्री करण्यात आले आहे. दरम्यान, देशभरात कोरोना लसीचा तुटवडा असल्याचा आरोप करणारे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी नव्या फेरबदल आणि मंत्रिमंडळातून काही मंत्र्यांना वगळल्याबद्दल निशाणा साधला आहे. मनसुख मांडवीया यांना देशाचे नवे आरोग्यमंत्री केल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, याचा अर्थ असा आहे की यापुढे लसींची कमतरता भासणार नाही का? तसेच या ट्विटमध्ये राहुल गांधींनी हॅशटॅग चेंजचा वापर देखील केला आहे.
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून राहुल गांधी केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर जोरदार टीका करीत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील कोरोना लसीचा आभाव संपवण्यासाठी अनेकवेळा विनंती केली आहे. मात्र, भाजप सरकारने काँग्रेसचा हा दावा खोटा असल्याचे सांगून फेटाळून लावला.
यापूर्वी राहुल गांधींनी बऱ्याचदा केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणाविरूद्ध जोरदार हल्लाबोल केला होता. गेल्या आठवड्यात कोरोना लस नसल्याबाबत राहुल गांधी यांनी एक ट्विट केले होते. त्यावेळी देखील त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. ज्यामध्ये असे म्हटले की, जुलै आला आहे, मात्र कोरोना लस आली नाही. यापूर्वी राहुल गांधी यांनीही कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या भरपाईच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर लक्ष्य केले होते.