हुबळी, गोकुळ रोड पोलिसांची कारवाई : 25 मोबाईल जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
ऑटोरिक्षातून बाजारात फिरून मोबाईल चोरणाऱया एका त्रिकुटाला हुबळी येथील गोकुळ रोड पोलिसांनी अटक केली. या टोळीतील आणखी पाच जण फरारी असून यामध्ये महिलांचाही समावेश आहे. त्यांच्याजवळून 6 लाख रुपये किमतीचे 25 मोबाईल व ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली आहे. गुन्हेगारांनी बेळगाव, हुबळी-धारवाड, गोकाक, यरगट्टी, एम. के. हुबळी परिसरात चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
गोकुल रोडचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची, उपनिरीक्षक एम. के. काळे, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक विश्वनाथ एम. ए., आर. आर. होंकनदावर, एन. आय. निलगार, बी. एफ. बेळगावी, एल. वाय. नायक, पी. एल. नागभूषण, एम. एम. हिरेमठ, एम. एम. बेन्नूर यांनी ही कारवाई केली. हुबळी शहर, अळणावर, बेळगाव, एम. के. हुबळी, गोकाक, यरगट्टी, गुलबर्गा, म्हैसूर, बळ्ळारीसह विविध गावांतील बाजारात फिरून हे गुन्हेगार मोबाईल चोरत होते.
भद्रावती, शिराळकोप्प, पुणे येथील महिला व पुरुषांची टोळी या मागे कार्यरत आहे. ऑटोरिक्षा भाडय़ाने घेऊन बाजारात फिरत ते मोबाईल चोरी करतात.
हणमंताप्पा हुलगाप्पा बंडीवड्डर (रा. हुलगीनकोप्प, ता. हाणगल), कुमार रामाप्पा कुळ्ळ (रा. अण्णानगर, भद्रावती), सोमशेखर फकिराप्पा कुंदगोळ (रा. जगदीशनगर, गोकुल रोड, हुबळी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हेमावती, कृष्णा, करकी, लक्ष्मी, यल्लव्वा आदी फरारी असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.
खिशातील मोबाईल हातोहात पळवितात…
या टोळीतील गुन्हेगार खासकरून शर्टाच्या खिशात मोबाईल ठेवणाऱयांना टार्गेट करतात. बॅग अडवी धरून खिशातील मोबाईल हातोहात पळविण्यात त्यांचा हातखंडा आहे. बेळगाव, हुबळी-धारवाडसह वेगवेगळय़ा ठिकाणी चोरलेले मोबाईल हाणगल, भद्रावती परिसरात विकल्याचे उघडकीस आले आहे.