ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंजुरी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, दरनिश्चिती करताना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. त्यानुसार महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयातून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत.
खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात आरोग्यमंत्री टोपे यांनी उपचाराबाबात खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंजुरी दिली असून ही अधिसूचना आजपासून 31 जुलै 2021 पर्यंत राज्यभर लागू राहील.
याबाबत माहिती देताना राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले की, संबंधित रुग्णालयाने रुग्णाला पूर्वलेखापरिक्षित देयक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर भरारी पथकांमार्फत पुन्हा तपासणी करण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची तरतूदही या अधिसूचनेत कायम ठेवण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
- वर्गवारीनुसार दरआकारणी होणार !
म्युकरमायकोसिसचा उपचार देणारे रुग्णालय कोणत्या विभागात आहे, त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांची, शहरांची आणि भागांची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार हे दर आकारले जातील. तसेच, कोणत्या सुविधा दिल्या जात आहेत, त्यानुसार प्रतिदिन कमाल किती दर आकारता येतील, हे सरकारने काढलेल्या आदेशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यानुसार…
वॉर्ड आणि आयसोलेशनची सुविधा :
अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी 4 हजार रुपये प्रतिदिन, ब श्रेणीसाठी 3 हजार रुपये प्रतिदिन तर क श्रेणीसाठी 2 हजार 400 रुपये प्रतिदिन आकारता येतील.
आयसीयूशिवाय फक्त व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन :
अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी 7 हजार 500 रुपये प्रतिदिन, ब श्रेणीसाठी 5 हजार 500 रुपये प्रतिदिन तर क श्रेणीसाठी 4 हजार 500 रुपये प्रतिदिन आकारता येतील.
आयसीयू, व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन :
अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी 9 हजार रुपये प्रतिदिन, ब श्रेणीसाठी 6 हजार 700 रुपये प्रतिदिन तर क श्रेणीसाठी 5 हजार 400 रुपये प्रतिदिन आकारता येतील.
दरम्यान, कोणत्या श्रेणीमध्ये कोणती शहर किंवा भाग येतात, यासंदर्भात देखील सरकारने जारी केलेल्या आदेशांमध्ये माहिती देण्यात आली आहे. यानुसार…
अ श्रेणी :
मुंबई विभाग (मुंबई महानगर पालिका, मीरा भाईंदर महानगर पालिका, ठाणे महानगर पालिका, नवी मुंबई महानगर पालिका, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, उल्हासनगर महानगर पालिका, अंबरनाथ महानगर पालिका, कुळगाव बदलापूर महानगर पालिका, पनवेल महानगर पालिका)
पुणे विभाग (पुणे महानगर पालिका, पुणे कन्टोनमेंट , खडकी कन्टोनमेंट, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, देहूरोड कन्टोनमेंट , देहू सीटी)
नागपूर विभाग (नागपूर महानगर पालिका, दिगडोह सीटी, वाडी सीटी)
ब श्रेणी :
नाशिक (नाशिक महानगर पालिका, एकलहरे, देवळाली कन्टोनमेंट, भगूर नगरपरिषद), अमरावती महानगर पालिका, औरंगाबाद (महानगर पालिका आणि कन्टोनमेंट), भिवंडी (महानगरपालिका आणि खोनी), सोलापूर महानगर पालिका, कोल्हापूर (महानगर पालिका आणि गांधीनगर), वसई-विरार महानगर पालिका, मालेगाव (महानगर पालिका, धायगाव, दरेगाव, सोयगाव, द्याने, मालदा), नांदेड महानगर पालिका, सांगली (सांगली-मिरज कुपवाड महानगर पालिका, माधवनगर)
क श्रेणी :
अ आणि ब गट वगळता सर्व भाग