प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्यात कापोली हलसाल रस्त्यावर दुचाकीस्वाराला म्हशीने ठोकरल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव सुधीर कृष्णराव देसाई (वय 28 रा. कापोली) असे आहे. तर त्याच्या पाठीमागे बसलेला सागर दौलत देसाई हा किरकोळ जखमी झाला आहे.
शनिवारी कापोली येथील सयाजी देसाई यांचे निधन झाले होते. त्यांचे निधन खानापूर येथील त्यांच्या निवासस्थानी झाले होते. त्यांचा मृतदेह रूग्णवाहिकेने कापोली येथे आणला जात होता. त्याचवेळी सुधीर देसाई हे आपल्या दुचाकीवरून रूग्णवाहिकेच्या पाठीमागून कापोलीकडे जात होते. रूग्णवाहिका कोपोलीत पोहोचली तरी सुधीर देसाई यांची दुचाकी पाहोचली नव्हती. वाटेतच त्यांना आडव्या आलेल्या म्हशीने ठोकरल्याने ते दुचाकीसह खाली कोसळून जागीच ठार झाले. ज्या रूग्णवाहिकेने सयाजी देसाई यांचा मृतदेह आणला होता त्याच रूग्णवाहिकेने सुधीर यांना सरकारी दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुधीर यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.