अधिकाऱयांकडून हवेत गोळीबार ; अधिकारी-स्थानिकांत झटापट,वनधिकारी, तीन स्थानिक जखमी,पाच तास वाहने रोखून धरली
उदय सावंत/ वाळपई
सत्तरी तालुक्मयातील म्हादई अभयारण्याच्या क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या गावातील नागरिकांचा व अभयारण्याच्या अधिकाऱयांचा संघर्ष आता विकोपाला गेला आहे. गेल्या काही काळापासून सातत्याने जमीन प्रकरणी वाद सुरू असल्यामुळे अनेकवेळा तणावाचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून जमीन मालकी हक्क व अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या गावातील नागरिकांच्या जमिनी अभयारण्याच्या क्षेत्रातून वगळण्याच्या मुद्दय़ावर अनेकवेळा आंदोलने झाली. या पार्श्वभूमीवर सध्या वातावरण तापले आहे.
सत्तरी तालुक्मयातील सावर्डे पंचायत क्षेत्रात येणाऱया करंझोळ, कुमठोळ व बंदीरवाडा या भागांमध्ये याचा मोठय़ा प्रमाणात प्रभाव दिसत आहे. काल बुधवरी तेथे मोठय़ा प्रमाणात संघर्ष पाहावयास मिळाला. विशेष म्हणजे संतप्त नागरिकांनी अभयारण्याच्या अधिकाऱयांची वाहने सुमारे पाच तास रोखून धरली. यादरम्यान नागरिक व अधिकारी यांच्यात झालेल्या झटापटीत परिक्षेत्र अधिकारी नारायण प्रभुदेसाई जखमी झाले असून स्थानिकांपैकी तिघा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
बुधवारी अभयारण्याचे अधिकारी नारायण प्रभुदेसाई आपल्या कर्मचाऱयांसमवेत स. 10 वा. कृष्णापूर येथे जात होते. बंदिरवाडा येथील रुक्मिणी गावडे या आपल्या घराची पावसाळय़ासाठी शाकारणी करत होत्या. यावेळी नारायण प्रभुदेसाई यांनी रुक्मिणी गावडे यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये मोठय़ा प्रमाणात बाचाबाची झाली. नारायण प्रभुदेसाई यांनी रुक्मिणी गावडे यांच्या हातात असलेला कोयता हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी सदर कोयता देण्यास नकार दिल्यामुळे त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करताना रुक्मिणी गावडे यांनी हातातील कोयता त्याचठिकाणी टाकून त्या घटनास्थळावरून पळून गेल्या.
नागरिकांची बंदीरवाडा येथे गर्दी
या संदर्भाची माहिती गावात पसरल्यानंतर गावातील नागरिकांनी एकूण घटनेसंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला व करंझोळ कुमठोळ व बंदिरवाडा येथील नागरिकांनी बंदिरवाडा याठिकाणी जमून नारायण प्रभुदेसाई व त्यांच्या कर्मचाऱयांची वाट पाहत रस्ता रोखून धरला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास प्रभुदेसाई त्यांच्यासोबत असलेल्या वनपाल तेजस्विता कुमार व इतर कर्मचारी 2 वाहनातून घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी सदर वाहने रोखून धरली.
रुक्मिणी गावडे यांच्याशी झालेल्या वादाबाबत गावातील नागरिकांनी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, असा आरोप यावेळी रुक्मिणी गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. आपल्या अंगावर धावून आल्यानंतरही नारायण प्रभुदेसाई या भागातील नागरिकांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. या अधिकाऱयांनी रुक्मिणी गावडे यांची प्रथम माफी मागावी, अन्यथा वाहने सोडणार नाही, असा इशारा दिला. मात्र नारायण प्रभुदेसाई यांनी माफी मागण्यास पूर्णपणे नकार दिला, यामुळे घटनास्थळी दाखल झालेले नागरिक अधिकच संतापले.
वनधिकारी प्रभुदेसाई यांच्याकडून हवेत गोळीबार
स्थानिकांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ज्यावेळी नारायण प्रभुदेसाई घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी नागरिकांनी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रभूदेसाई यांनी आपल्या सोबत असलेले पिस्तुल काढून हवेत तीन वेळा गोळीबार केला. यामुळे नागरिक बरेच संतापले व यावेळी झालेल्या झटापटीत प्रभुदेसाई यांच्या उजव्या हाताला व कानाच्या बाजूला मोठी दुखापत झाली आहे.
अभयारण्य अधिकाऱयासाह तीन स्थानिक जखमी
स्थनिक व अधिकाऱयांच्यात झटापट झाल्यामुळे प्रभुदेसाई व स्थानिकांमध्ये तणावाची परिस्थिती झाली व यामध्ये प्रभुदेसाई व स्थानिक तीन नागरिक जखमी झाले आहेत. याच्या निषेधार्थ स्थानिकांनी वनखात्याच्या अभयारण्ये विभागाची दोन वाहने रोखून धरली. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोन्ही वाहने नागरिकांनी रोखून धरली होती. यावेळी वारंवार दोघाही दरम्यान शाब्दिक चकमक करण्याचा प्रकार घडला.
नागरिकांनी पोलिंसाना बोलविले
साडेतीन वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिक हरिश्चंद्र गावस यांनी वाळपई पोलीस स्थानकाशी संपर्क साधून एकूण घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर यावेळी उपनिरीक्षक विष्णू जाधव, हवालदार दामोदर गावकर, पोलीस बंदोबस्तासाठी दाखल झाले. यावेळी त्याने स्थानिकांशी योग्य प्रकारे चर्चा केली. त्यानंतर दोन्ही गटांच्या प्रतिनिधींना वाळपई पोलिस स्थानकावर बोलविण्यात आले.
अटक केल्याशिवाय गप्प बसणार नाही : हरिश्चंद्र गावस

पत्रकारांशी बोलताना स्थानिकांनी नारायण प्रभुदेसाई यांच्यावर जोरदार टीका केली आहे. प्रभुदेसाई याठिकाणी आल्यानंतर आतापर्यंत अनेक प्रकारच्या तक्रारी त्यांच्या विरोधात आहेत. गावातील नागरिकांत दहशत निर्माण करून त्यांना सरकारी अधिकाऱयांचा धाक दाखविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. काही स्थानिकांना हाताशी धरून नागरिकांच्या विरोधात राजकारण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रसंगी बोलताना हरिश्चंद्र गावस यांनी सांगितले की, प्रभुदेसाई यांनी या गावातील नागरिकांचा अपमान केलेला आहे. जोपर्यंत त्यांना पोलिस अटक होत नाही तोपर्यंत स्थानिक गप्प बसणार नसल्याचा इशारा दिलेला आहे. गेल्या सुमारे पाच वर्षांपासून भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या जमिनीचा मालकी हक्क प्राप्त व्हावा, त्याचप्रमाणे अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या गावातील नागरिकांच्या लागवडीखाली जमिनी वगळाव्यात अशा प्रकारची प्रमुख मागणी करण्यात येत आहे . मात्र त्याकडे सरकारची यंत्रणा पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे सातत्याने स्थानिक व नागरिक यांच्या दरम्यान संघर्ष होताना दिसत आहे. सरकार या भागांमध्ये बळी जाण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल हरिश्चंद्र गावस यांनी केला आहे.
स्वतःच्या बचावासाठी हवेत गोळीबार करावा लागला : प्रभुदेसाई

अभयारण्य अधिकारी नारायण प्रभुदेसाई यांना हवेत गोळीबारासंदर्भात विचारणा केली असता, अचानक मोठय़ा संख्येने लोक अंगावर आल्यानंतर आपण स्वतःच्या व सोबत असलेल्या कर्मचाऱयांच्या बचावासाठी हवेत गोळीबार केला. गोळीबार करण्यामागे नागरिकांना डिवचण्याचा कोणताही आपला हेतू नव्हता. आपल्या सोबत वरि÷ अधिकारी उपवनपाल तेजस्विता कुमारी होत्या. माझ्यासह त्यांच्या जीवाला धोका होता. यामुळे आपल्याला नाईलाजास्तव हवेत गोळीबार करावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रुक्मिणी गावडे यांच्याकडील कोयता हिसकावण्याच्या प्रयत्नासंदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की तिच्या घरापासून काही अंतरावर मोठय़ा प्रमाणात बेकायदा झाडांची कत्तल करण्यात आली आहे. यामुळे आपण तिला यासंदर्भात विचारले; मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे तिच्यासोबत आपला वाद झाल्याचे प्रभुदेसाई यांनी यावेळी स्पष्ट केले. या भागात काम करताना आपल्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, यामुळे आपण वरि÷ांशी यासंदर्भात सविस्तरपणे बोलणार असल्याचे, प्रभुदेसाई यांनी स्पष्ट केले.
स्थानिकांना अडकविण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर : आंतानियो पिंटो

बुधवारी घडलेल्या प्रकरणासंदर्भात जर स्थानिकांना कोणत्याही गुन्हय़ांतर्गत अडकवण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा भूमिपुत्र संघटना पदाधिकारी आंतानियो पिंटो व स्थानिकांनी दिलेला आहे. आमच्या समस्याकडे लक्ष कोण देणार?, असा प्रश्न उपस्थित करून स्थानिकांनी सरकार आमच्या मागण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. आमच्यासोबत सरकारकडून थट्टा सुरू आहे. अशी टीका स्थानिकांनी केलेली आहे. याप्रकरणी वाळपई पोलीस स्थानकावर नागरिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केल्यास सरकारला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत वाळपईच्या पोलिस स्थानकावर परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे उशिरापर्यंत या संदर्भात माहिती मिळू शकलेली नाही. त्याचप्रमाणे जखमी झालेले नारायण प्रभुदेसाई व इतर स्थानिक नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यासंदर्भात अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.