प्रतिनिधी / मिरज
सांगली येथील माजी नगरसेवक अनिल बंडू पाटील-सावर्डेकर (वय 62) यांचा मृतदेह रविवारी सकाळी तालुक्यातील म्हैसाळ येथे कृष्णानदी पत्रात बंधाऱ्याजवळ सापडला. शनिवारी सायंकाळी सांगलीत स्वामी समर्थ घाटावर कृष्णा नदीत आंघोळ करीत असताना ते वाहून गेले होते. याबाबत त्यांचा मुलगा संदीप अनिल पाटील-सावर्डेकर यांनी मिरज ग्रामीण पोलिसात वर्दी दिली आहे. दरम्यान, आयुष्य हेल्पलाईन टीमच्या जवानांनी सावर्डेकर यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला.
याबाबत ग्रामीण पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळेलेली अधिक माहिती अशी की, अनिल सावर्डेकर हे सांगली येथील माजी नगरसेवक आहेत. शनिवारी दुपारच्या सुमारास कृष्णा नदीत आंघोळीसाठी स्वामी समर्थ घाटावर ते गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. स्वामी समर्थ घाटावरही शोधाशोध केली मात्र ते मिळून आले नाहीत. नदीत आंघोळ करीत असताना ते वाहून गेले असावेत, अशी चर्चा होती.
सावर्डेकर हे नदीच्या पाण्यातूनच गायब झालाचा संशय बळावल्याने शनिवारी सायंकाळपासूनच आयुष्य हेल्पलाईन टीम आणि विश्वसेवा फाउंडेशनचे जवान नदीपात्रात त्यांचा शोध घेत होते. टीम प्रमुख अविनाश पवार, इम्तियाज बोरगावकर, मुश्ताक बोरगावकर, अल्ममाश पट्टणकुडे, जमीर बोरगावकर, दिलावर बोरगावे, बबलू बोरगावकर, ईमरान बोरगावकर या जवानांनी रात्री दोन वाजेपर्यंत शोध मोहीम सुरूच ठेवली होती.
रविवारी सकाळी म्हैसाळ येथे कृष्णा नदी पात्रात बंधाऱ्याजवळ पुरुष जातीचा एक मृतदेह तरंगत असल्याचे एका मच्छिमाराला दिसले. त्याने तात्काळ ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. ग्रामीण पोलिसांनी आयुष्य हेल्पलाईन टीमला याची माहिती दिली. यावेळी मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. सदर मृतदेह हा अनिल पाटील-सावर्डेकर यांचा असल्याचे स्पष्ट झाले. सावर्डेकर यांच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. त्यांचा मुलगा संदीप पाटील-सावर्डेकर यांनी मिरज ग्रामीण पोलिसात वर्दी दिली आहे.
Previous Articleसातारा : सभापती सरिता इंदलकर यांनी अभियंत्यांना घेतले फैलावर
Next Article कोल्हापूर : मसुद मालेत आजवर एकही कोरोनाबाधित नाही
Related Posts
Add A Comment