
हॉलिवूडच्या सायन्स फिक्शन चित्रपटांमध्ये माणसाला यंत्रात आणि यंत्राला माणसामध्ये रुपांतरित होताना अनेकदा पाहिले असेल. खऱयाखुऱया आयुष्यात ही कामगिरी करून दाखवत आहे युक्रेनचा कलाकार दमित्री ब्रागिन. तो चालत्या-फिरत्या माणसाला एक मास्क परिधान करायला लावून यंत्रात बदलतो. त्याचे हे मास्क सायन्स फिक्शन चित्रपटांमधील व्यक्तिरेखांसारखे वाटते.
मूळचा युक्रेनचा रहिवासी असलेला दमित्री स्टीमपंक म्हणजेच मशीनसारख्या डिटेल्स मास्क तयार करण्यात तरबेज आहे. यात कुठलाच मूव्हिंग पार्ट नसतो. सायन्स फिक्शन चित्रपटांमधूनच त्याने याकरता प्रेरणा घेतली आहे.
हे मास्क तयार करण्यासाठी दमित्री प्लास्टिक मास्कचा वापर करतो आणि त्यानंतर आकार देत यात सजावटीच्या गोष्टी लावल्या जातात. पाहता पाहता हा अद्भूत मशीनसारखा मास्क तयार होतो. त्याच्या मास्कमध्ये दुचाकीच्या सुटय़ाभागांचा वापर होतो. बिघाड झालेले कॅमेरा लेन्स आणि मेटॅलिक खेळण्यांचा वापर केला जातो. परंतु मास्क पाहिल्यावर तो टाकाऊ सामग्रीपासून तयार केल्याचे कुणीच म्हणू शकणार नाही.
दिसण्यास हा मास्क 100 टक्के मेटॅलिक वाटतो. मास्कवर मेटॅलिक रंगामुळे असे वाटते. मास्ककरता वापरण्यात आलेली बहुतांश सामग्री वजनाने हलकी असते. मेटॅलिक रंगामुळे ती जुनी आणि वजनदार दिसू लागतात. दमित्री ब्रागिनचे स्वतःचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेज असून तेथे तो स्वतःची कला लोकांसमोर सादर करतो. याचबरोबर हे मास्क तो दुकानांमध्ये विक्रीस ठेवतो.