प्रतिनिधी/ बेळगाव
गीतेच्या माध्यमातून ज्यांनी सर्व जगाला तत्त्वज्ञानाची शिकवण दिली त्या श्रीकृष्णाची जन्माष्टमी शहरात साधेपणाने साजरी झाली. दरवषी श्रीकृष्ण मंदिरांमध्ये जन्माष्टमीला मोठा उत्साह असतो. शहापूर येथील मुरलीधर मंदिर, बालाजी मंदिर, टिळकवाडी येथील ईस्कॉन मंदिरात भाविकांची गर्दी होते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे खबरदारी म्हणून मंदिरातील कार्यक्रम रद्द करण्यात आले. परिणामी भाविकांविना मंदिरेही सुनीसुनी झाली.
जन्माष्टमीनिमित्त बाजारपेठेत श्रीकृष्ण मूर्ती घेऊन विपेते आले होते. मात्र, त्याची किरकोळ प्रमाणात विक्री झाली. घरोघरी मात्र श्रीकृष्ण जन्माष्टमी सर्व धार्मिक विधींसह करण्यात आली. काही समाजामध्ये जन्माष्टमीला खास फराळ व प्रामुख्याने विविध प्रकारचे लाडू करण्याचा प्रघात आहे. काही ठिकाणी घरांमध्येसुद्धा श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्रीकृष्णाला पाळण्यात घालून पाळणागीत म्हणण्यात आले. यंदा दहीहंडीचा उत्सव मात्र होत नसल्याने तरुणाई हिरमुसली आहे.
टिळकवाडीच्या राधा गोकुळानंद मंदिरात बुधवारी जन्माष्टमी होणार आहे. यंदा हा उत्सव ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. श्रीकृष्णाच्या श्रीविग्रहांचा अभिषेक भाविकांना घरी बसूनच पाहता येईल. या दिवशी पहाटे 4.30 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री 9 वाजता भक्तीरसामृत स्वामी महाराजांचे प्रवचन होणार आहे. सर्व कार्यक्रम फेसबुक पेजवर पाहता येतील. मात्र दि. 11 ते 13 ऑगस्टपर्यंत मंदिरातील सर्व दर्शन पूर्णपणे बंद राहील, असे कळविण्यात आले आहे.
दरवषी जन्माष्टमीला शाळांमध्ये कृष्णाच्या विविध रुपांवर आधारित वेशभूषा स्पर्धा घेतल्या जातात. त्या आनंदालाही बालचमू मुकला आहे. मात्र हौशी मातांनी आपल्या मुलांना श्रीकृष्ण रुपात सजवून त्यांचे फोटो व्हायरल केले आहेत.