दररोज सरकारकडे अहवाल पाठविणे अनिवार्य, 28 मार्च ते 11 एप्रिलपर्यंत चालणार परीक्षा, कॅमेरे बसविण्याचे आदेश, कोरोनाचे नियम पालन करण्याची सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
दहावी परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जाते. त्यामुळे ही परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे आता दहावीच्या प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे, असा आदेश सार्वजनिक शिक्षण विभागाने दिला आहे. कोरोनामुळे दोन वर्षे परीक्षेला बरीच शिथीलता देण्यात आली होती. मात्र यावषी कोरोना नियंत्रणात आल्याने दहावीची परीक्षा पूर्वीप्रमाणेच अत्यंत काटेकोरपणे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परीक्षेचे दररोजचे फुटेज हे सरकारकडे त्याच दिवशीच पाठविण्यात येणार आहेत.
दरवर्षी शिक्षण खाते ज्या माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत त्या शाळांनाच परीक्षा पेंद्र म्हणून मान्यता देण्यात येईल, असे सांगत आहे. पूर्वीप्रमाणेच यावर्षीही परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱयांची नजर असणार असल्याचे शिक्षण खात्याने सांगितले असले तरी ग्रामीण भागातील सर्रास परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले नसल्याने सरकारकडून आता 40 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जर संबंधित शाळेकडे हा निधी नसल्यास इतर शाळांकडून मागून घेण्याची मुभाही देण्यात आली आहे. त्यामुळे आता सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे.
शिक्षण खात्याकडून 2018 पासून संबंधित दहावींच्या केंद्रांवर सीसीटीव्ही बसवून घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्यापही काही शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले नाहीत. त्यामुळेच सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेवून सीसीटीव्ही बसवून घेण्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. शिक्षण खात्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सांगितल्यानंतर अनेक शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास असमर्थता दर्शविल्याचे उघड झाले होते. त्यातच दोन वर्षे कोरोना राहिल्यामुळे याकडे दुर्लक्ष झाले होते. आता ते बसवून घेण्यासाठी सूचना वजा आदेश देण्यात आला आहे. राज्यभरात दहावीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून मान्यता देताना यापुढे ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱयांची सुविधा उपलब्ध आहे अशाच शाळांमध्ये परीक्षा घेतल्या जातील, असा दरवर्षी इशारा कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा महामंडळाकडून दिला जातो. 2015 मध्ये कोरोनाचा फैलाव व 2016 मध्ये वार्षिक परीक्षेवेळी कॅमेरे बसविले नव्हते. ग्रामीण भागातील सर्रास परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नसल्याचे उघडकीस आले होते. मात्र या सर्व अडचणी दूर झाल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी दक्ष रहा! : जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची माहिती

दहावीची परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. विद्यार्थ्यांचा पहिला टप्पा म्हणून या परीक्षेकडे पाहिला जातो. ही परीक्षा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि काटेकोरपणे पार पडली पाहिजे. त्यासाठी शिक्षण विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली आहे.
जिल्हा पंचायतीच्या सभागृहात दहावी परीक्षेच्या पूर्वतयारीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीमध्ये त्यांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. बेळगाव आणि चिकोडी विभाग राज्यात यावषीही अव्वल यावा यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न केले पाहिजे. बेळगाव जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा आहे. तेंव्हा योग्यप्रकारे परीक्षेचे नियोजन करावे, असे जिल्हाधिकाऱयांनी यावेळी सांगितले.
यावषी दहावीच्या पूर्वचाचण्या आधीच पूर्णपणे पार पडल्या आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. कर्नाटकात अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची गरज आहे. त्या दृष्टिने शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
परीक्षा केंद्रांवर सर्व ती खबरदारी आणि उपाययोजना करा, असे स्पष्ट केले. कोरोना कमी झाला असला तरी बेजबाबदारपणा कोणीही करू नये. योग्यप्रकारे कोरोनाचे नियम पाळत या परीक्षा घ्याव्यात, असे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांना येताना मास्क घालण्याची सूचना देखील करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. 28 मार्च ते 11 एप्रिलपर्यंत ही परीक्षा होणार आहे. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे अधिकारी शशिकांत मुन्याळ, जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, चिकोडी जिल्हा शिक्षणाधिकारी मोहनकुमार व्यंकटेश, पोलीस विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.