दुसरी टी-20 लढत : सामनावीर मॉर्गन, मलानची अर्धशतके, बाबर, हाफीझची अर्धशतके वाया
मँचेस्टर:
कर्णधार इयॉन मॉर्गनने फटकावलेल्या 33 चेंडूतील 66 धावांमुळे इंग्लंडने दुसऱया टी-20 सामन्यात पाकवर 5 गडय़ांनी विजय मिळवित तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मॉर्गन सामनावीरचा मानकरी ठरला.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर पाकने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 195 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. पण इंग्लंडने 19.1 षटकांतच 5 बाद 199 धावा जमवित शानदार विजय नोंदवला. इंग्लंडचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो (24 चेंडूत 44) व टॉम बॅन्टन (16 चेंडूत 20) यांनी 66 धावांची सलामी दिली. पण दोन चेंडूंच्या फरकाने दोघेही बाद झाल्यानंतर मॉर्गनने जबरदस्त फटकेबाजी करीत आव्हान जिवंत ठेवले. त्याने 6 चौकार, 4 षटकारांची आतषबाजी केली. शेवटच्या 3 षटकांत 18 धावांची गरज असताना तो बाद झाला. त्याने डेव्हिड मलानसमवेत 112 धावांची भागीदारी केली. मलानने नाबाद अर्धशतकी खेळी करीत पाच चेंडू बाकी असताना संघाचा विजय साकार केला. मलानने 36 चेंडूत नाबाद 54 धावा फटकावल्या. 12 व्या टी-20 सामन्यातील त्याचे हे सातवे अर्धशतक आहे.
विशेष म्हणजे बीबीसीने 21 वर्षांत पहिल्यांदाच या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले.
पाकच्या डावात कर्णधार बाबर आझमने 44 चेंडूत 56 तर मोहम्मद हाफीझने आक्रमक फटकेबाजी करीत 36 चेंडूत 69 धावांची आतषबाजी केली. पण शेवटी त्यांच्या खेळी वाया गेल्या. आता गुरुवारी तिसरा सामना होणार असून मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी पाकला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. गेल्या शुक्रवारी पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता.
संक्षिप्त धावफलक
पाक 20 षटकांत 4 बाद 195 : बाबर आझम 56 (44 चेंडूत 7 चौकार), फखर झमान 36 (22 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), हाफीझ 69 (36 चेंडूत 5 चौकार, 4 षटकार), शोएब मलिक 14 (11 चेंडूत 1 चौकार), अवांतर 12. गोलंदाजी : जॉर्डन 1-41, टिम करन 1-46, आदिल रशिद 2-32.
इंग्लंड 19.1 षटकांत 5 बाद 199 : बॅन्टन 20 (16 चेंडूत 1 षटकार), बेअरस्टो 44 (24 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), मलान नाबाद 54 (36 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), मॉर्गन 66 (33 चेंडूत 6 चौकार, 4 षटकार), मोईन अली 1, सॅम बिलिंग्स 10 (5 चेंडूत 2 चौकार), अवांतर 4. गोलंदाजी : शदाब खान 3-34, हॅरिस रौफ 2-34.