ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील महिन्यात शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागानं धाडी टाकल्या. सलग 4 जाधव यांच्या घरी धाडसत्र सुरू होतं. आयकर विभागाने जाधव यांच्या घरातून आणि कार्यालयातून मोठय़ा प्रमाणात कागदपत्रे जप्त केली होती. त्यामधून आयकर विभागाच्या हाती काय लागले याची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी देखील सोमय्या यांनी यासंदर्भात आज एक नवे ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.
किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”शिवसेना नेते यशवंत जाधव आणि त्यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव यांनी 24 महिन्यात मुंबईत 1000 घरं/ दुकानं/ गाळे असलेल्या 36 बिल्डिंग (जुन्या पघडीच्या इमारती) विकत घेतल्या. त्यांचा एक हजार कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे. ईडी, कंपनी मंत्रालय, आयकर विभागाद्वारे तपास चालू आहे, काही दिवसात कारवाईची अपेक्षा आहे.”
दरम्यान, जाधव परिवाराकडे एवढी मालमत्ता आहे तर त्यांचा “मालक – नेत्यांकडे किती असणार?, असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केला आहे.