ऑनलाईन टीम / जेरुसलेम :
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी अनेक देशात नागरिकांना मास्क बंधनकारक आहेत. लॉकडाऊन काळात अनेक महागडे मास्कही बाजारात आले. मात्र, इस्रायलमध्ये एक शाही मास्क तयार होत आहे. या मास्कची किंमत तब्बल 11 कोटी 23 लाख रुपये आहे. हा मास्क जगातला सर्वात महागडा असून, यामध्ये 18 कॅरेट सोने, 3600 काळ्या आणि पांढऱ्या हिऱ्यांचा आणि उच्च दर्जाच्या N95 फिल्टरचा वापर करण्यात येणार आहे.
अमेरिकास्थित एक चिनी व्यापारी या मास्कचा मालक आहे. त्याने यावेल या इस्रायलमधील कंपनीला मास्क तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. या मास्कचे वजन 270 ग्रॅम असेल.
यावेल कंपनीचे मालक लेवी यांनी सांगितले की, मास्क खरेदीदार व्यापाऱ्याला हा मास्क चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत बनवून हवा आहे. तसेच हा मास्क जगातील सर्वात महागडा असावा, अशी त्याची अपेक्षा होती. कंपनीच्या माध्यमातून माझ्या कर्मचाऱ्यांना या अत्यंत आव्हानात्मक काळात काम मिळाले याचा मला आनंद आहे, असेही लेवी म्हणाले.