मुलांना शिकता यावे म्हणून गुहेत सुरू केली शाळा , अफगाणिस्तानच्या बामियात प्रांतातील प्रकार
अफगाणिस्तानात तालिबानची राजवट येऊन 6 महिने उलटले आहे. तालिबानच्या भीतीने लोकांनी शहर आणि देश सोडून पलायन केले होते. बौद्ध संस्कृतीशी निगडित प्राचीन शहर बामियानमध्येही असेच घडले. तेथील बहुतांश लोकांनी पलायन केले आहे. या भीतीयुक्त स्थितीत एका पदवीधर युवती फिस्ताने हिंमत दाखविली आहे.
गरीब मुलांचे शिक्षण सुरू रहावे याकरता तिने स्वतःची शाळा बंद केली नाही. तालिबानच्या तावडीत सापडू नये म्हणून तिने पर्वतावरील गुहेत स्वतःची शाळा सुरू केली आहे. तेथे दर दिनी ती मुलांना 2 तास शिकवत आहे. तिने केवळ स्थानिक डारी भाषाच नव्हे तर इंग्रजीचेही मुलांना धडे दिले आहेत. तसेच धर्मग्रंथांचीही शिकवण दिली आहे. ही शाळा चालविण्यासाठी तिने लोकांच्या घरात काम केले आणि स्थानिक बाजारात सामग्री देखील विकली आहे.

10 वर्षांपासून सुरू शाळा
ही शाळा सुरू करून आता 10 वर्षे झाली आहेत. 12 वर्षांची असताना ही शाळा मी सुरू केली होती. या शाळेत परिसरातील सुमारे 50 कुटुंबातील 4-17 वर्षांपर्यंतची मुले येतात. ऑगस्ट महिन्यात तालिबानने कब्जा केल्यावर मी घाबरले होते. लोकांकडे आता मुलांना शिकविण्यासाठी पैसे नाहीत, अशा स्थितीत ही शाळाच त्यांच्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे फिस्ताने सांगितले.
तालिबानला लागला नाही सुगावा
भिंतींवर चिकटविलेली पोस्टर्स हटवावीत असे माझ्या मित्रांनी सुचविले होते. मी मुलींना देखील शिकवत होते. यामुळे ही पोस्टर्स काढून ती नदीत फेकली होती. गावापर्यंत तालिबानचे दहशतवादी तीनवेळा आले, परंतु त्यांना गुहेतील माझी शाळा सापडू शकली नसल्याचे ती सांगते. पूर्ण बामियानमध्ये फिस्ता एकटी आहे जी स्वतःच्या पैशांनी ही शाळा चालविते.