पेडणे – (प्रतिनिधी )
मोपा विमानतळ प्रकल्पाचे काम करणाऱया कंपनीच्या तक्रारीवरून तिघा युवकांना अटक झालेल्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून राजकीय हेतुने प्रेरित असलेले काहीजण या प्रकरणाचा सं?बंध विनाकारण आपल्याशी जोडत आहेत, असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी स्पष्ट केले आहे. मोपा विमानतळ प्रकल्पाचे काम सुरु असताना व विमानतळ सुरु झाल्यानंतरही स्थानिकांना नोकऱयांत प्राधान्य मिळावे हाच आमचा आग्रह असून पेडणे मतदारसंघातील युवकांवर अन्याय होऊ देणार नाही, या भूमिकेचा आजगावकर यांनी पुनरुच्चार केला आहे.
पोलिसांत नोंद झालेले प्रकरण मोपा विमानतळावर काम करणाऱया कंपनीच्या तक्रारीवरून झाले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईशी माझा काहीही संबंध नाही. राजकारण करू पाहणारे काही लोक युवकांची दिशाभूल करून त्यांना भडकाऊ पाहात आहेत. युवकांनी अशा नतद्रष्ट लोकांच्या कारस्थानांना बळी पडू नये. मोपा विमानतळ प्रकल्पात नोकऱयांमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात येणार असून स्थानिकावर अन्याय होणार नाही याकडे माझा कटाक्ष आहे. अन्याय होत असल्याचे दिसून आल्यास माझ्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन आजगावकर यांनी केले आहे.
मोपा विमानतळ सुरु झाल्यानंतरही या प्रकल्पात स्थानिकांना नोकऱयांत प्राधान्य असेल. या प्रकल्पात निर्माण होणाऱया रोजगारसंधींचा लाभ मिळावा यासाठी स्थानिकांना कामाचे प्रशिक्षणही देण्यात येणार असून लवकरच प्रशिक्षण केंद्रही सुरु करण्यात येणार आहे. विमानतळ प्रकल्पात निर्माण होणाऱया नोकऱयांशी संबंधीत प्रशिक्षण देऊन स्थानिकांना नोकऱयांच्या पात्रतेसाठी सज्ज करण्यात येईल, असे आजगावकर यांनी सांगितले
मोपा विमानतळ प्रकल्पात स्थानिकांना डावलले जात असल्याची हूल उठवून आपले राजकीय इप्सति साधण्याचा प्रयत्न काहीजण करत आहे. निवडणूक जवळ येत असल्याने हे राजकारण खेळण्यात येत आहे. पण, युवकांनी अशा विघ्नसंतोषी लोकांच्या कारस्थानांना बळी पडू नये. स्थानिक युवकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. मी तळागाळात काम करून, तसेच सामान्यांच्या प्रश्नांवर आंदोलने करूनच इशपर्यंत आलेलो आहे. मोपा विमानतळ प्रकल्पात स्थानिकांनाच प्राधान्य द्यावे अशी सूचना या प्रकल्पाचे काम करणाऱया कंत्राटदार कंपनीला करण्यात आली आहे. पात्र असलेल्या स्थानिक युवकास डावलून इतर कोणालाही नोकरी दिल्याचे आढळल्यास माझ्याकडे संपर्क साधावा. पेडणे मतदारसंघातील कोणाही युवकावर मी अन्याय होऊ देणार नाही. स्थानिकांना नोकऱयांमध्ये डावलल्यास आंदोलन करण्यास मी पुढे असेन व हे आंदोलन प्रखर असेल, असे आजगावकर यांनी स्पष्ट केले.
मोपा विमानतळाला दक्षिण गोव्यातून मोठा विरोध होत होता तेव्हा या प्रकल्पाच्या समर्थनार्थ मी पुढाकार घेऊन महारॅली काढली होती. स्थानिकांनीही मला त्यासाठी मोलाची साथ केली. या प्रकल्पाचा पेडणे मतदारसंघातील युवकांना लाभ मिळेल या एकमेव उद्देशाने हा प्रकल्प आम्ही खेचून आणला होता, याचे स्मरणही आजगावकर यांनी करून दिले आहे.
पेडणे मतदारसंघात येणाऱया प्रत्येक प्रकल्पात नोकऱयांमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य मिळावे हा आमचा आग्रह आहे. धारगळ येथे होऊ घातलेल्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमध्येही रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून येथेही स्थानिकांनाच प्राधान्य असेल, अशी हमी आजगावकर यांनी दिली.