दिल्ली प्रतिनिधी
युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. चंदन जिंदाल असं या 22 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा पंजाबमधील बर्नाला या ठिकाणचा आहे. इस्केमिक स्ट्रोकच्या (Ischemic stroke) आजारामुळे चंदन जिंदालवर विनिस्टीयामधील इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
युक्रेनमधील खारकिव्हमध्ये रशियन सैन्याने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात कर्नाटकमधील नवीन शेखराप्पा या विद्यार्थ्याचे मंगळवारी निधन झाले होते. त्यानंतर आज दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचे निधन झाल्याने भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
चंदन जिंदालच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबियांना कळवण्यात आली आहे. या विद्यार्थ्याच्या वडिलांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहून आपल्या मुलाचे शव भारतात आणले जावे अशी विनंती केली आहे.