प्रभारी दिनेश गुंडू राव यांची माहिती, : भाजपचे काही आमदार संपर्कात असल्याही गौप्यस्फोट
प्रतिनिधी /पणजी
आगामी विधानसभा निवडणूकपूर्व युती करण्यासाठी गोवा फॉरवर्ड, मगोप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांकडे बोलणी चालू असल्याची माहिती काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी दिली. भाजपचे काही आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. परंतु नावे उघड करण्यास मात्र नकार दर्शविला.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, भाजपला विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांच्या युतीची गरज आहे. निधर्मी मतांचे विभाजन होऊन त्याचा लाभ भाजपला होऊ नये म्हणून युती आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
त्या चुका पुन्हा होणार नाहीत
विधानसभा निवडणुकीत जर भाजपला धूळ चारायची असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. विरोधी पक्ष एकत्र झाले नाही तर मात्र भाजपला आयतीच संधी मिळेल. 2017 मधील काँग्रेस पक्षाने केलेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी पक्ष घेणार असल्याचे राव यांनी सांगितले.
गुरुवारपासून ‘जागोर’ उपक्रम
युतीची चर्चा निर्णायक वळणावर असून 18 नोव्हेंबरपासून महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्ष ‘जागोर’ हा उपक्रम राबवणार आहे. हा उपक्रम 5 दिवस चालणार असून 40 मतदारसंघात काँग्रेस पक्षाची पथके फिरून जनजागृती करणार आहेत, असेही राव यांनी सांगितले.
‘आप’ ही भाजपची ‘बी’ टीम
काँग्रेस पक्ष हा निधर्मी असून त्याने कधीच जातीचे राजकारण केले व खेळले नाही. ‘आप’ ने भंडारी समाजाचा मुख्यमंत्री करतो आणि ख्रिश्चन समाजाचा उपमुख्यमंत्री देतो, असे सांगितले आहे. तसे काँग्रेसने कधी केलेले नाही. ‘आप’ ही भाजपची ‘बी’ टीम असल्याची टीका राव यांनी केली.
काही पक्ष उमेदवार जाहीर करीत असून काँग्रेस मात्र निवडणूक जाहीर झाली की नंतरच उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे राव म्हणाले. पत्रकार परिषदेला महिला काँग्रेस अध्यक्ष बीना नाईक, आलेक्स सिक्वेरा यांची उपस्थिती होती.