रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्षाचे भारतासह अवघ्या जगावर दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे आता ठळकपणे पाहायला मिळत आहेत. आज जग ही एक बाजारपेठ बनली असून, प्रत्येक राष्ट्र हे या ना त्या माध्यमातून कुणावर ना कुणावर अवलंबून असल्याचे दिसते. रशिया व युक्रेन या दोन्ही देशांचे स्वतःचे म्हणून या बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान आहे. स्वाभाविकच या दोन देशांमध्ये संघर्ष टोकाला जात असेल, तर त्याची धग इतर देशांना बसणे क्रमप्राप्त ठरते. सोव्हिएत युनियनच्या विभाजनानंतर निर्मिती झालेला युक्रेन हा देश सूर्यफूल तेल उत्पादनात जगात अग्रेसर आहे. याशिवाय रशियातही मोठय़ा प्रमाणावर सूर्यफुलाचे उत्पादन घेतले जाते. साधारणपणे हे दोन देश मिळून 60 टक्क्यांवर सूर्यफूल तेल काढतात. निर्यातीतही त्यांचा वाटा जवळपास 80 टक्के इतका दिसून येतो. दोन देशांमधील युद्धाचा निर्यातीला फटका बसणार, हे वेगळे सांगायला नको. तसे झाल्यास खाद्यतेलाचे दर आणखी भडकण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भारतासारख्या देशाची खाद्यतेलाची गरज दिवसेंदिवस वाढत असून, मागील वर्षात आपण 1 लाख 17 हजार कोटींचे खाद्यतेल आयात केल्याचे आकडेवारी सांगते. आपले खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व पाहता निश्चितपणे या सगळय़ाची झळ आपल्याला बसू शकते. कोरोनानंतर जगभरात तेलबिया, अन्नधान्य, सोयाबीन तेल, पामतेल, सूर्यफूल तेलासह एकूणच खाद्यतेलाच्या किमती चढत्याच राहिलेल्या आहेत. कोरोना ओसरल्यानंतर या किमती काहीशा कमी होऊन लोकांना दिलासा मिळण्याची आशा असताना युद्ध संकटामुळे पुन्हा ग्राहकांची कोंडी होण्याची भीती आहे. आजमितीला एका लिटरमागे तेलाचे दर सर्वसाधारण 130 ते 160 रुपयांपर्यंत सीमित आहेत. हे दर पुन्हा 160 वा 170 रुपयांवर गेले, तर रोजच्या बजेटवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. जगात सर्वाधिक गहू उत्पादन रशियात होत असून, निर्यातीतही हा देश आघाडीवर आहे. तर युक्रेनही पहिल्या पाचात आहेत. या दोन्ही देशांत जगातील 29 टक्के गहू पिकविला जाणे, दोघांकडून जगाला 19 टक्के मक्याचा पुरवठा होणे, या सगळय़ा बाबी त्यांचे कृषी क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित करतात. पण, या दोघांमधील भांडणामुळे इतर देशांनाही तेल व अन्नटंचाईच्या झळा बसल्या, तर त्यात आश्चर्य मानण्याचे कारण नाही. खनिज तेल उत्पादनात सौदी अरेबिया प्रथम क्रमांकावर, तर रशिया दुसऱया क्रमांकावर आहे. तर नैसर्गिक वायूचा पुरवठादार म्हणून रशिया हा देश अग्रस्थानी आहे. जगातील सर्व राष्ट्रांच्या विकासाचे इंजिन म्हणून या दोन घटकांकडे पाहिले जाते. आज विविध ऊर्जाप्रकल्पांचे पर्याय पुढे आले असले, तरी त्यांची उपलब्धता मर्यादित आहे. त्यामुळे खनिज तेल ही आजदेखील सर्वांची गरज आहे. परंतु, ही स्थिती अशीच राहिली, तर दरांमध्ये आणखी वाढ होणार, हे वेगळे सांगायला नको. आज खनिज तेलाचे दर प्रतिबॅरल 100 डॉलरला टेकले आहेत. भारताची आयातीवरील 85 टक्के मदार यावर आहे. हे पाहता तेलदराचा भडका हा अर्थव्यवस्थेपुढे आव्हान निर्माण करणारा म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय किंमत व सध्याचा भाव बघता तेल कंपन्यांना तोटा सोसावा लागत आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांतील निवडणुकांमुळे या तेल कंपन्यांना ही दरवाढ रोखून धरावी लागली आहे. किंबहुना, निवडणुका संपल्यावर इंधनदरात वाढ होणार, ही काळय़ा दगडावरची रेघ आहे. पेट्रोलचा दर अगदी 125 रुपये लिटरवर जाऊ शकेल, असेही तज्ञांचे म्हणणे आहे. रशिया व युक्रेनमधील युद्ध लांबत गेले, तर अर्थातच हा प्रश्न अधिकच बिकट होईल. पेट्रोल, डिझेल वाढल्यास वाहतुकीचाही खर्च वाढणार, हे ओघाने आलेच. अन्नधान्य, कडधान्ये, भाज्यांपासून ते बांधकाम साहित्यापर्यंत सगळय़ाच क्षेत्रांना अलीकडच्या काही दिवसांत महागाईने ग्रासले आहे. युद्धाची कोंडी कायम राहिल्यास या सर्वच क्षेत्रांना पुन्हा धक्के बसण्याची चिन्हे आहेत. अलीकडे प्रदुषणाला पर्याय म्हणून एलपीजीचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. भारतातील अनेक शहरांची वाहतूक पुढे सरकविण्यात हा गॅस महत्त्वाची भूमिका बजावतो. तथापि, एलपीजी पुरवठादार प्रमुख देशच युद्धात गुंतलेला असेल, तर या आघाडीवरही युद्धपातळीवर बरीच कसरत करावी लागेल. अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. अन्न शिजविण्याकरिता आज प्रामुख्याने स्वयंपाकाचा गॅसच वापरला जातो. घरगुती सिलेंडरचा दरही अलीकडे 900 रुपयांवर असून, तो या स्थितीमुळे आणखी वाढला, तर सामान्यांचे कंबरडेच मोडले जाईल. म्हणूनच सगळय़ांनाच पुढच्या काळात आर्थिक व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही युद्धाचे परिणाम तात्कालिक व दूरगामी असतात. केवळ एखाद दुसरे क्षेत्र त्याने बाधित होते, असे नव्हे. तर अनेकविध क्षेत्रे त्यात भरडली जात असतात. पॅलेडियम नावाचा चकाकणारा पांढरा धातू असून, त्याचे सर्वाधिक उत्पादन रशियात होते. त्याचा वापर पेट्रोल आणि हायब्रीड गाडय़ांच्या एक्झॉस्ट, स्मार्टफोन, इलेक्ट्रिक उत्पादने, दंतचिकित्सा आणि दागदागिन्यांमध्ये होतो. युद्धजन्य परिस्थितीमुळे पॅलेडियमच्या किमतीतही वाढ झाली असून, परिणामी दागिन्यांसह सर्वच वस्तूंच्या किमतींना आगामी काळात त्याची धग बसणार आहे, हेही लक्षात घ्यावे लागेल. जर्मनी आणि फ्रान्सनंतर भारताकडून युक्रेनला सर्वाधिक प्रमाणात औषधांचा पुरवठा होतो. यावरही परिणाम संभवतात. मागच्या चार ते पाच दिवसांचा शेअर बाजाराचा आलेख पाहिला, तर सेन्सेक्सही तीन ते साडेतीन हजारांपर्यंत खाली आलेला पाहायला मिळतो. एलआयसीचा बहुचर्चित आयपीओ येऊ घातला असतानाच असे नकारात्मक वातावरण निर्माण झाल्याने बाजारातील धास्ती वाढली आहे. एकूणच हे युद्ध रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये होत असले, तरी त्यात सगळे जगच ऐनकेनप्रकारेन ओढले गेले आहे. अर्थातच जागतिक घडी विस्कटण्यासह महागाईच्या संकटाचा सामना आता जगाला करावा लागणार आहे.
Previous Articleमनोरंजन व्यक्त होण्याचे साधन
Next Article नटराज मंदिरात धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ
Related Posts
Add A Comment