प्रतिनिधी /मडगाव
विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर अनेक उमेदवारांनी देव दर्शन करण्यावर भर दिला. सलग दोन महिने प्रचारात गुंतलेल्यानंतर अनेकांनी आपल्या फॅमिलीसह गोव्याबाहेर जाणे पसंत केले. मात्र, याला अपवाद राहिले ते कुंकळळीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार युरी आलेमाव हे. त्यांनी विमान उड्डाण करण्यावर भर दिला.
युरी आलेमाव हे पेशाने विमान पायलट आहेत. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्स, सिडनी ऑस्ट्रेलिया येथून विमानचालन डिप्लोमा प्राप्त केलेला आहे. राजकारणात सक्रीय होण्यापूर्वी ते विमान पायलट म्हणून काही काळ कार्यरत होते. गेल्या शनिवारी त्यांनी दिल्ली-मुंबई मार्गावर विमान उड्डाण केले.
युरी आलेमाव यांनी आपल्या वडिलाच्या पावलावर पाऊल ठेऊन राजकारणात प्रवेश केला. सर्वप्रथम ते सांगे मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. परंतु त्यांना यश आले नाही. आत्ता ते कुंकळळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातून विजयी झाल्यास, गोवा विधानसभेत विमान पायलट म्हणून प्रवेश करणारे ते पहिले आमदार ठरणार आहेत.
गोवा विधानसभेत आत्ता पर्यंत वकिल, डॉक्टर, अभियंते, कलाकार, शिक्षक, व्यावसायिक, कंत्राटदार, उद्योजक यांनी प्रवेश केलेला आहे. मात्र, विधानसभेत आज पर्यंत कोणीच विमान पायलट नव्हता. युरी आलेमाव हे विजयी झाल्यास ते पहिले आमदार असेल जे विमान पायलट म्हणून ओळखले जातील.
कुंकळळी मतदारसंघात काँग्रेसचे युरी आलेमाव व भाजपचे क्लाफास डायस यांच्यात जोरदार लढत झालेली आहे. या मतदारसंघाचा निकाल काय असेल हे सांगणे सद्या तरी कठीण आहे. युरी आलेमाव व क्लाफास डायस या दोघांनी आपण विजयी होऊ असा दावा केलेला आहे.
कुंकळळीतील निकालाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. कारण सासष्टीतील तीन आमदारांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यात नुवे मतदारसंघातून विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा, वेळळीतून फिलीप नेरी रोड्रिग्स व कुंकळळीतून क्लाफास डायस यांचा समावेश होता. बाबाशान व फिलीप नेरी सोडल्यास क्लाफास डायस यांनी एकटय़ानेच भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय किती सार्थ होता हे आणखीन दहा दिवसांनी स्पष्ट होणार आहे.