प्रतिनिधी / सातारा :
साताऱ्यातील आरटीओ कार्यालयाच्या चौकात एका टपरीवर चहा पीत असलेल्या युवकावर चाकू व कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन युवकांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामधील दोन युवक साताऱ्यातील व एक कोंडवे, ता. सातारा येथील आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार युवक शुभम विनोद कांबळे (वय 26, रा. बुधवार पेठ, सातारा) हा दि. 11 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास साताऱ्यातील आरटीओ चौकात एका टपरीवर चहा पीत उभा होता. त्यावेळी तिथे कृष्णा शिंदे (रा. कोंडवे, ता. सातारा), गौरव भिसे उर्फ टेटय़ा व शुभम साठे (दोघे रा. ढोरगल्ली, सातारा) हे तिघेजण आले. त्यातील कृष्णा शिंदे याने शुभमला किरकोळ कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. तर शुभम साठे याने शुभम कांबळेवर चाकूने पाठीत वार केला तर कृष्णा शिंदे याने कोयत्याने डोक्यात वार केला. मात्र तो वार शुभम कांबळे याने चुकवल्याने तळहातावर लागून तो जखमी झाला. त्यानंतर शुभम कांबळे याला उपचारासाठी कराडमधील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. त्याने दि. 13 रोजी याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर तीन युवकांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.