- पंतप्रधान मोदी आणि योगींकडून आर्थिक मदत जाहीर
ऑनलाईन टीम / कानपूर :
उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे बस आणि टॅम्पोच्या धडकेमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये 30 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना लाला लजपत राय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन वाहनांची धडक झाल्यानंतर बस पलटली. ही बस लखनऊवरुन दिल्ली जात होती. चार जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती कानपूरचे पोलीस निरिक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली. जखमी व्यक्तींनी ते कानापूर जिल्ह्यातील सचेंडी येथील असल्याचे सांगितले आहे.
जखमीपैकी अनेकजण हे येथील बिस्कीटच्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार आहे. हे कामगार टेम्पोने कामासाठी कारखान्यामध्ये जात असतानाच हा अपघात झाल्याची माहिती मोहित यांनी दिली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला तपास पोलीस करत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
- पीएम मोदींकडून शोक व्यक्त

कानपूरमध्ये झालेला रस्ता अपघात अतिशय दु:खादायक आहे. या अपघातात अनेक लोकांचे प्राण गमावले आहेत. मी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त करतो आणि जखमींच्या आरोग्यात लवकरच सुधारणा व्हावी, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
कानपूरमधील या दुःखद घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटूंबासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत रक्कम जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींना 50,000 रुपयांची मदत घोषित केली आहे. ही रक्कम पीएमएनआरएफकडून दिली जाईल, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
- मुख्यमंत्री योगींनी दिले चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कानपूरमधील भीषण रस्ता अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी आणि सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. जखमींना त्वरित उत्तम वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई आणि जखमींवर योग्य उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले असून लवकरात लवकर अहवाल मागविला आहे.