ऍमेझॉन इंडियाच्या सर्व्हेत समोर आली माहिती- 54 टक्के जणांना हवाय 5 जी स्मार्टफोन ः 25 हजारपर्यंतचे फोन मागणीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारती एअरटेलसह अनेक कंपन्यांनी आपल्या 5 जी चाचण्यांना वेग दिला असून येणाऱया काळामध्ये ग्राहकांची मागणी अधिक करून 5 जी स्मार्टफोन्सना असणार असल्याची माहिती ऍमेझॉन इंडिया यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या उत्सवी काळात 5 जी संबंधीत सेवा देणाऱया मोबाईल फोन्सची चलती दिसून येणार आहे.

ऍमेझॉन इंडियाने नुकताच या संदर्भातला एक सर्व्हे केला होता. ज्यामध्ये अनेकांना 5 जी स्मार्टफोन्स घ्यायचे असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. 15000 रुपये ते 25000 रुपये किमतीतील स्मार्टफोन्स ग्राहकांना घ्यावयाचे असल्याची बाबही सर्वेक्षणात दिसून आली आहे. टायर वन, टायर टू व टायर थ्री शहरांमध्ये ऍमेझॉन इंडियाने नुकताच एक सर्व्हे केला होता. येणाऱया उत्सवी काळात ग्राहकांचा कल फोन खरेदीकडे मोठय़ा प्रमाणात असणार असल्याची बाब लक्षात घेऊन ऍमेझॉन इंडियाने हा सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये 54 टक्क्यांहून अधिक जणांनी 5 जी स्मार्टफोन्सच घेण्याची इच्छा प्रकट केली आहे. यापैकी 37 टक्के जणांनी 15 ते 25 हजार रुपयापर्यंतचे 5जी स्मार्टफोन्स घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
5 जी सेवेसाठी सध्या चाचण्यांना वेग आला असून अनेकांच्या यशस्वी होताना दिसत आहेत. 5 जीमुळे येणाऱया काळात डिजिटल व्यवस्था आणखी बळकट होताना दिसणार आहे.
सॅमसंगसह शाओमी, वन प्लसला पसंती
या गटामध्ये सॅमसंग, शाओमी व वन प्लस या सध्याला आघाडीवरच्या कंपन्या आहेत. यातील अनेकांनी सॅमसंग मोबाईलला सर्वाधिक पसंती दर्शविली आहे. या पाठोपाठ शाओमी आणि वन प्लस कंपनीचे स्मार्टफोन्स घेण्यासाठी बहुतेकांनी इच्छा दर्शविली आहे. यामध्ये रेड मी नोट 10, वन प्लस नॉर्ड आणि सॅमसंग एम-21 व इतर गॅलेक्सी एम सिरीजमधील स्मार्टफोन्स पसंतीचे ठरले आहेत.