मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा
प्रतिनिधी / पणजी
कला अकादमीतून अनेक कलाकार घडले. आजही गोव्याबाहेरली कलाकार गोव्यात येतात कला अकादमीचा उल्लेख करतात. गोव्यात विशेष महत्त्व आहे व हे महत्त्व टिकून ठेवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. कला अकादमीच्या संरचनेला धक्का न देतात पूर्ण नूतनीकरण व उत्कृष्टरित्या आधुनिक तंत्रज्ञान पद्धती वापरून करण्याचा प्रयत्न आहे. 49 कोटी रूपये खर्च करून येत्या 10 महिन्यात कला अकादमीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य़मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. कला अकादमी इमारतीच्या दुरूस्तीकामाच्या शुभारंभप्रसंगी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत हेते. यावेळी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, साबांखा मंत्री दीपक पाऊसकर, व इतर मान्यवर उपस्थित होते.
कला अकादमी विविध प्रकारच्या समस्येला सामोरे जात होती. 1970 पासून कला अकादमी कार्यरत आहे. कला अकादमीने कला संस्कृतीचे जतन करण्यासाठी अनेक कलाकार घडविण्यात मोलाचा वाटा आहे .सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर गोव्याचे नाव कला अकादमीने आणले. कोविड महामारीच्या काळात सरकारने राज्याला स्वयंपूर्ण बनविण्याचा ध्यास घेतला आहे. त्या अनुषंगाने विविध प्रकल्पे सरकारने हाती घेतले आहेत. जुवारी पूलाचे काम, कला अकादमीचे नूतनीकरण, पेडणे राष्ट्रीय महामार्ग, मोपा विमानतळ यासारख्या प्रकल्पांवर सरकार काम करत आहेत. या वास्तूवर 49 कोटी गुंतवणूकीचा निर्णय योग्य असून येत्या 10 वर्षात याची भरपाई होणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
गोवा कलाकारांची खाण आहे. आधुनिक साधनसुविधेसह आता ही वास्तू उभारली जाणार आहे. डिसेंबर 2021पर्यंत राज्यात अनेक पायाभूत सुविधा पूर्ण होतानाचे चित्र पाहायला मिळणार आहे असे साबांखा मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.
मागील दीड वर्षे कला अकादमी विषय वेगवेगळय़ा कारणात्सव चर्चेचा विषय बनला होता. या इमारतीच्या मजबूतीकरणासाठी सरकार इमारत पाडण्याच्या विचारात आहे असे अपप्रचार वेगवेगळय़ा घटकांनी केले. पण आता नूतनीकरणाच्या निर्णयामुळे याला पूर्णविराम मिळणार आहे असे मंत्री गावडे यांनी यावेळी सांगितले.
पायाभरणी कार्यक्रमानंतर वसंत बापट लिखित आणि 1970 साली कला अकादमी निर्मित कला अकादमीच्या नाटय़ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांतर्फे ‘गोमंत दर्शन’ या कार्यक्रमाची झलक सादर करण्यात आली. यंदाचे वर्ष हे गोवामुक्तीचे हिरक महोत्सवी वर्ष असल्यामुळे गोमंत दर्शनची नव्याने निर्मिती केली आहे. हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त देशाच्या विविध शहरात आणि राज्यातील विविध भागात कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम पूर्ण रूपात गोवा राज्यदिनादिवशी म्हणजेच 30 मे रोजी सादर करण्यात येईल अशी माहिती प्राचार्य रामराव वाघ यांनी यावेळी दिली. यावेळी दीपक आमोणकर यांनी आभार प्रकटन केले.