प्राचीन भारतीय योगविद्येचा आता जगभर प्रसार झाला आहे. अर्थात त्यामागे या योगविद्येचा शरीर व मनासाठी होणारा असीमित लाभच कारणीभूत आहे. योगासनांबाबत सतत नवी संशोधनेही होत आहेत. नियमितपणे योगाभ्यास केल्याने मेंदूची वयोपरत्वे हानी होण्यास प्रतिबंध होतो, असे मत आता एका नव्या संशोधनातून पुढे आले आहे.
- डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिऑलॉजी अँड अलाईड सायन्सेस या संस्थेच्या संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. योगामुळे हृदयविकारासही आळा बसतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
- संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजे डीआरडीओच्या प्रयोगशाळेने केलेले हे संशोधन महत्त्वपूर्ण असून ते अमेरिकन एजिंग असोसिएशनच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते.
- योगाचा अतिरक्तदाब, हृदयाचे ठोके व ताण यावर काय परिणाम होतो, हे तपासण्यात आले.
- माणसाचा मेंदू वयाच्या वीस ते तीस वर्षांपर्यंत वाढतो; पण चाळिसाव्या वर्षानंतर मेंदूचा विकास थांबतो. त्याचा र्हास सुरू होतो. या संशोधनासाठी 20 ते 50 वयोगटातील 124 निरोगी व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला.
- त्यांचे तीन गटांत वर्गीकरण करून काहींना रोज एक तास याप्रमाणे तीन महिने योग करण्यास सांगण्यात आले.
- योगापूर्वी रक्तदाब 20-29 वयोगटात 122-69 होता, तो 119-68 झाला. 40 ते 50 वयोगटात रक्तदाब योगाआधी 134-84 होता, तो योगानंतर 124-79 झाला.
- योगापूर्वी 20-29 वयोगटात कॉर्टिसोल या ताणकारक रसायनाचे प्रमाण 68.5 टक्के होते, ते योगानंतर 47.4 टक्के इतके झाले.
- 40-50 वयोगटात योगापूर्वी ते 95 टक्के होते, ते योगानंतर 72.7 टक्के झाले. डोपॅमाईन, सेरोटोनिन यांचे प्रमाणही सुधारले, त्यामुळे त्यांच्यात उत्साह व सकारात्मकता आली.