भाजपकडून 107 उमेदवारांची पहिली यादी : उपमुख्यमंत्री मौर्य सिराथूमधून लढणार : 20 आमदारांना नाकारली संधी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भाजपने उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी शनिवारी 107 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात सर्वात चकित करणारे नाव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे राहिले. योगी हे गोरखपूर शहर मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. यापूर्वी ते अयोध्येतून निवडणूक लढवतील असे मानले जात होते. तर उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे सिराथू मतदारसंघात उमेदवार असतील. आगरा ग्रामीणमध्ये बेबीरानी मौर्य भाजपच्यावतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यापूर्वा त्या उत्तराखंडच्या राज्यपाल राहिल्या आहेत.
107 उमेदवारांमध्ये 44 हे ओबीसी, 19 अनुसूचित जातीचे तर 10 महिलांचा समावेश आहे. या यादीत 21 नव्या चेहऱयांना स्थान मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उमेदवारांची ही यादी जारी केली आहे. भाजपच्या यादीत पहिल्या टप्प्यातील 58 पैकी 57 जागांवरील उमेदवारांची नावे सामील आहेत. तर दुसऱया टप्प्यातील 55 पैकी 48 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. उर्वरित मतदारसंघांबद्दल अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. शनिवारी जाहीर झालेली यादी पाहता पक्षाने 20 विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली आहे.
भाजपने योगी आदित्यनाथ यांना गोरखपूर शहरमधून निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. साहिबाबाद या मतदारसंघात सुनील शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने पुन्हा एकदा नोएडामध्ये पंकज सिंह यांना संधी दिली आहे. लोनी येथे नंदकिशोर गुर्जर तर गाजियाबाद येथे अतुल गर्ग हे पक्षाचे उमेदवार असतील. जेवर मतदारसंघात धीरेंद्र सिंह हे निवडणूक लढवतील. तर हायप्रोफाइल ठरलेल्या मथुरा मतदारसंघात पक्षाने पुन्हा एकदा श्रीकांत शर्मा यांच्यावर विश्वास दाखविला आहे.
पहिल्या यादीत 60 टक्के दलित अन् मागास
भाजपच्या पहिल्या यादीत 60 टक्के उमेदवारी ओबीसी आणि दलित नेत्यांना मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे अनारक्षित मतदारसंघातही भाजपने दलित नेत्यांना संधी दिली आहे. अलिकडेच भाजपला रामराम ठोकलेल्या 14 आमदारांनी भाजपवर उच्चवर्णीयांचा पक्ष असल्याचा आरोप केला होता. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात सामील होणाऱया नेत्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. हे आरोप खोडून काढण्यासाठी भाजपने आता दलित आणि ओबीसींना 60 टक्के उमेदवारी देण्याचे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
44 ओबीसी उमेदवार
भाजपच्या 107 उमेदवारांमध्ये 44 हे मागास जातीचे आहेत. तर 19 उमेदवार अनुसूचित जातीशी संबंधित आहेत. याचबरोबर भाजपने 10 महिलांना संधी दिली आहे. 107 पैकी 63 विद्यमान आमदारांवर पुन्हा विश्वास दाखविण्यात आला आहे. पश्चिम उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल यांच्यातील आघाडी पाहता भाजपने अत्यंत विचारपूर्वक हे उमेदवार निवडल्याचे मानले जात आहे.