जिल्हय़ात कोविड लसीकरणाला प्रारंभ, मुलांचा प्रतिसाद
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोविड-19 लसीकरण सुरु करण्याबाबत शासनस्तरावरुन देण्यात आलेल्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने रत्नागिरीत 3 जानेवारी रोजी 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड-19 लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी जिल्ह्य़ात एकूण 1774 मुलांचे लसीकरण करण्यात आले.
या मोहिमेत 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड-19 लसीकरण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्या हस्ते नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोकणनगर, रत्नागिरी येथे शुभारंभ करण्यात आला. रत्नागिरी जिह्यामध्ये ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर कोविड-19 लसीकरण आठवडय़ातून बुधवार व शनिवार या दोन दिवशी घेण्यात येत आहे. या लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लसीचाच वापर करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.
या लसीकरणाचे नियोजन कार्यक्षेत्रातील शाळा व महाविद्यालये येथे केल्यास लसीकरणाला गती मिळण्यास मदत होईल असे डॉ. आठल्ये यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समवेत डॉ. एम. एम. सूर्यवंशी वैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, डॉ. परिमल गोडे, वैद्यकीय अधिकारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोकणनगर रत्नागिरी, डॉ. सुधीर दुसाने, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
कोविड-19 लसीकरणाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, सीईओ डॉ. इंदुराणी जाखड व उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती व बांधकाम सभापती उदय बने यांनी नागरिकांना केले आहे.
जिल्हय़ात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे सोमवारी झालेले लसीकरणः
तालुका लसीकरण
मंडणगड 209
दापोली 345
खेड 60
गुहागर 255
चिपळूण 105
संगमेश्वर 481
रत्नागिरी 101
लांजा 60
राजापूर 158