सुमारे 27 कोटी 2 लाख सुधारित व 17 कोटी 11 लाखांचे मूळ अंदाजपत्रक
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा परिषदेची स्वत : च्या उत्पन्नाचे व खर्चाचे 2020-21 चे अंतिम सुधारित व 2021-22 चे मूळ अंदाजपत्रक मंजुरीसाठी विशेष सर्वसाधारण सभा लोकनेते शामराव पेजे सभागृहात नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष विकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. सभेत नूतन सभापती पदभार हाती घेतलेले वित्त व शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी हे पहिलेच अंदाजपत्रक सभागृहात सादर केले. 2020-21 च्या मूळ अंदाजपत्रकातील अपेक्षित अनुदान पाप्त न झाल्याने 2020-21 चे अंतिम अंदाजपत्रकात विभागांचे मागणी प्रमाणे तरतुदी उपलब्ध करता आलेली नसल्याचे त्यांनी सुरूवातीलाच स्पष्ट केले. तरीही पत्येक विभागाला पुरेशा तरतुदी उपलब्ध करून देण्यात आल्याचे मणचेकर यांनी सांगितले.
गतवर्षीपासून 2020-21 हे वित्तीय वर्ष समाप्त होण्यापूर्वी मूळ अंदाजपत्रकातील तरतुदी प्रमाणे सुमारे 8 कोटी 84 लाख अपेक्षित निधी रत्नागिरी जिल्हा परिषदेला अपेक्षित होता. तर शासनाकडून जमीन महसूल व मुद्रांक शुल्क असा एकूण 10.90 कोटी निधी अपेक्षित असताना आज अखेर पाप्त झालेला नाही. अशा वेळी 2020-2021 च्या एकत्रित महसूल, भांडवल व वित्तपेषणासह सुमारे 27 कोटी 2,32,191 रु. चे अंतिम सुधारित अंदाजपत्रक व 2021-22 च्या एकत्रित महसूल, भांडवल व वित्तपेषणासह 17 कोटी 11,45,138 रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकाला जिल्हा परिषदेने मंजुरी दिली.