आपले मासेमारी जाळे फाडून केली कासवाची सुटका
नीलेश सूर्वे / तवसाळ
गुहागर तालुक्यातील तवसाळ आगर गावात मच्छीमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला पाटील कुटुंबीयांकडून जीवदान देण्यात आले आहे. तालुक्यातील अरबी समुद्राच्या शेवटच्या टोकाला असणारे गाव म्हणजे तवसाळ आगर. अवधूत पाटील आणि त्यांचा पुतण्या विक्रांत पाटील हे दोघे नियमीतपणे उदर निर्वाहासाठी बिगर यांत्रिकी होडीतुन मच्छिमारी करतात. मच्छीमारीसाठी टाकलेल्या जाळ्यामध्ये भेटलेले मासे काढण्याकरता जाळ्यापर्यंत पोहोचल्यानंतर जाळ्यामध्ये मोठा मासा सापडल्याचे त्यांना जाणवले. मात्र प्रत्यक्षात ते भलेमोठे ऑलिव्ह रिडले जातीचे कासव असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कासव अडकल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील काका-पुतण्याने स्वतःचे किमती जाळे कापून त्या ऑलिव्ह रिडले जातीच्या भल्यामोठ्या कासवांची जाळ्यातून मुक्त करून त्याला पुन्हा समुद्रात सोडून दिले.
