प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी नगर परिषदेच्या सुमारे 50 वर्षे जुन्या इमारतीच्या जागी उभारल्या जाऱया नवीन अद्ययावत प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज 2 नोव्हेंबर रोजी नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राउत, विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. रत्नागिरी नगर परिषदेचा प्रशासकीय कारभार चालत असलेल्या जुन्या इमारतीचे निर्लेखन करून नवीन इमारतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

16 मे 1971 रोजी तत्कालीन आमदार शामराव पेजे यांच्याहस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले होते. सुमारे 50 वर्षांची वाटचाल झालेल्या या इमारतीची डागडुजी आवश्यक बनली होती. या इमारतीसह शहरातील अन्य नगर परिषदेच्या मालकीच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले त्यामध्ये ही इमारत वापरासही योग्य नसून दुरूस्तीही करू शकत नसल्याचा शेरा देण्यात आला होता. त्यामुळे जुन्या इमारतीचे निर्लेखन करून नव्या इमारतीसाठी वेगाने कार्यवाही सुरू झाली.
नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 14 कोटी 28 लाख 54 हजार 87 रूपये अंदाजपत्रक आहे. निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरने यासाठी 20.67 टक्के म्हणजे 2 कोटी 95 लाख वाढीव दराची मागणी केली. हा विषय मागील सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. नगर परिषदेच्या सल्लागार आर्कीटेक कन्सल्टंटने 9.65 टक्केच्या वर दरवाढ देणे शक्य नसल्याचा अभिप्राय दिला होता. त्याला निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरने तयारी दर्शवली. अखेर आज मंगळवार 2 नोव्हेंबर रोजी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या इमारतीचे भूमीपूजन केले जाणार आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा ः
मंगळवार 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वा. ठाणे येथून हेलिकॉप्टरने सकाळी 10.30 वा. रत्नागिरीत. सकाळी 11 वा. नगर परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम. सकाळी 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हयातील नगरपरिषद, नगरपंचायतींच्या प्रशासकीय व विविध विकास कामांचा आढावा. दुपारी 1.30 वाजता तेथून मोटारीने रत्नागिरी विमानतळ व दुपारी 1.45 वाजता हेलिकॉप्टरने ठाणेकडे प्रयाण.