दापोली / प्रतिनिधी
मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ, रोहिदास वाडी येथे 5 सप्टेंबर रोजी झालेल्या एसटी अपघातातील सत्य आता बाहेर आले आहे. एसटी मधून प्रवास करणाऱ्या दापोलीतील प्रवाशांनी ही बस चालक न चालवता वाहक चालवत असल्याचा जबाब एसटी प्रशासनाला दिला आहे. यामुळे खळबळ उडाली असून संबंधित चालक व वाहकाला तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
याबाबत बोलताना दापोली एसटी आगाराच्या प्रमुख मृदुला जाधव यांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. संबंधित या गाडीतून प्रवास करणाऱ्या दापोलीतील प्रवाशांनी ही गाडी चालक चालवत नव्हते. तर वाहक चालवत होता. असा जबाब दिलेला असल्याचे त्यांनी तरुण भारतशी बोलताना स्पष्ट केलेले आहे. मात्र संबंधित घटना ही मंडणगड तालुक्याच्या हद्दीत घडलेली असल्यामुळे आपण सदर जबाब केवळ मंडणगड बस डेपोत पाठवलेले आहेत. अद्याप वरिष्ठ कार्यालयातून याबाबत आपणाला कोणताही आदेश प्राप्त न झाल्याने आपण सदर चालक व वाहक यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.