प्रतिनिधी/ सातारा
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद पार्श्वभूमीवर रविवारी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरेदीला सुट मिळाली आहे. कापड दुकानांसह सुकामेव्यांची दुकाने गर्दीने फुलली होती. रमजान निमित्त शेवयांना सर्वाधिक मागणी असून, त्याखालोखाल काजू, बदाम, मणुके, असा सुकामेवा खरेदी केला जात होता.
मुस्लिम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्याला 24 एप्रिल पासून सूरूवात झाली. या महिन्यात अत्यंत कडक उपवास पाळले जातात. या महिन्यामध्ये सुका मेवा, मिठाई, फळे, खजूर यांची मागणी वाढली होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे खरेदीवर बेक्र लागला होता. या काळात मुस्लिम बांधवांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले. लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले. तोच कापड दुकानदारांना दुकाने सूरू करण्याची परवानगी मिळाली. यामुळे आज दि. 25 मे रोजी साजरा करण्यात येणाऱया रमजान ईद सणानिमित्त बाजारपेठ सजली होती. या सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी बाजारामध्ये नवीन कापडय़ांसह अत्तर, शेवया, सुकामेवा खरेदीसाठी गर्दी झाली होती. रमजान ईदचे वैशिष्टय़ असलेल्या शिरखुर्म्यासाठी विविध प्रकारच्या शेवया खरेदी केल्या जात होत्या. या शेवया 100 ते 130 रूपये किलो दराने विकल्या जात होत्या. या शिवाय बदाम, पिस्ता, काजू, खोबरा किस, विलायची, मणुका यांनाही मागणी होती. ईद सणासाठी रेडिमेड कपडय़ांची खरेदी करण्यास प्राधान्य देण्यात आले. यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.