पिरनवाडी येथील शा-सद्रोद्दिन अन्सारी दर्गाचे सदस्य रफीक मुजावर यांचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
पिरनवाडी येथील सहारा स्टील्सचे संचालक तसेच पिरनवाडी येथील शा-सद्रोद्दिन अन्सारी दर्गाचे सदस्य रफीक मुजावर यांनी सर्व मुस्लीम बंधू-भगिनींना कोरोनाचे नियम पाळत घरीच रमजान ईद-नमाजपठण करावे, असे आवाहन केले आहे.
सध्या कोरोनापासून बचाव करणे महत्त्वाचे आहे. जगच संकटात आले आहे. तेव्हा प्रत्येकाने या संकटाचा सामना केला पाहिजे. कोरोनाचे नियम पाळत रमजान ईद साजरी करावी. रमजान महिन्यामध्ये 30 रोजे अथक कष्टाने केले आहेत. लॉकडाऊन सारख्या परिस्थितीत मुस्लीम समाजातील अनेक दानशूर समाजसेवी संस्थांनी आपल्यापरीने गोर-गरीब व गरजू लोकांकरिता मदत केली आहे.
औषधे, भाजीपाला तसेच इतर जीवनावश्यक वस्तू देवून जी भक्ती केली आहे. तीच अल्लाहप्रती खरी सेवा ठरली आहे. ईश्वर सर्वांचे कल्याण करो आणि सर्व नियम पाळत रमजान ईद साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.