महिला क्रिकेटमध्ये लक्ष्मणकडे महत्त्वाची जबाबदारी शक्य
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सध्या न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाची कामगिरी असमाधानकारक झाल्याने नजीकच्या काळात या संघामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघाची प्रमुख प्रशिक्षक रमेश पोवार यांच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी संपली असून पुन्हा ते या पदासाठी इच्छुक असल्यास बीसीसीआयच्या नियमानुसार त्यांना पुन्हा फेरअर्ज दाखल करावा लागेल.
भारताच्या आगामी महिला क्रिकेट संघाची बांधण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या सध्या सुरू असलेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळविता आला नाही. 2020 च्या आयसीसीच्या टी-20 महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाऱया भारतीय संघाला वुरकेरी रमण हे प्रमुख प्रशिक्षक लाभले होते. त्यानंतर रमण यांच्या जागी रमेश पोवार यांची प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. रमेश पोवार यांच्या प्रशिक्षकपदाचा करार आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत बीसीसीआयने केला होता. त्यामुळे त्यांना या पदासाठी मुदतवाढ देण्याचा प्रश्नच येत नाही. आता भारतीय महिला क्रिकेट संघासाठी नव्या प्रशिक्षक नियुक्तीसाठी अर्ज आणि मुलाखती प्रक्रियेला प्रारंभ करण्यात येणार आहे. रमेश पोवार कदाचीत पुन्हा या पदासाठी अर्ज करतील, असा अंदाज आहे. रमेश पोवार यांच्या प्रशिक्षकपदाच्या कालावधीत भारतीय महिला संघाला प्रत्येक मालिका गमवावी लागली असल्याने त्यांची पुन्हा या पदासाठी निवड करण्याची शक्यता मावळली आहे.
आयसीसीची 19 वर्षांखालील वयोगटाची महिलांची युवा टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुढीलवर्षी पहिल्यांदाच होणार असून या स्पर्धेसाठी भारतीय युवा महिला संघ निवडीसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली जात असून यामध्ये लक्ष्मण यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या जागी दुसऱया गोलंदाजाचा शोध सुरू आहे.