युक्रेनमध्ये युद्धात गुंतलेले सैनिक आणि सैन्याधिकारी यांना रशियाने प्राप्तीकरमुक्त केले आहे. तसेच या युद्धात मानवी मूल्यांचे पालन करणाऱया सैनिकांना विशेषः पुरस्कार दिले जाणार आहेत. या सैनिकांना भ्रष्टाचारविरोधी कायद्यापासूनही दूर ठेवण्यात येणार आहेत. सध्या रशिया युक्रेन युद्धासाठी सैन्य भरती करीत आहे. तथापि, तेथील तरुण सैनिक होण्यात फारसे तयार नाहीत. त्यांना सैन्याचे आकर्षण वाटावे आणि त्यांना युक्रेनच्या युद्धासाठी प्रवृत्त करण्यासाठी ही करमुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रशियाचे सरकार लोकांना सक्तीने सैन्यात भरती करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात येत आहे. हा आरोप खोटा ठरविण्यासाठी आणि सक्ती न करता युवकांना सैन्यामध्ये भरती होण्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम असल्याची माहिती रशियाच्या सरकारी सूत्रांनी दिली असून युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी याचा उपयोगही होत असल्याचे दिसून आले आहे. प्राप्तीकरमुक्तीची योजना आणि भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या कार्यकक्षेतून सैनिकांना मुक्त ठेवण्याचा उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे रशियाचे म्हणणे असले तरी, पाश्चात्य देशांनी या उपक्रमांवर टीका केली आहे.