देवाचीहट्टी रस्त्यासाठी 2.95 कोटीचा निधी मंजूर : डांबरीकरण कामाचा शुभारंभ
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्याचा खऱया अर्थाने विकास व्हायचा झाल्यास संपर्क रस्ते मजबूत करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठीच गेल्या साडेतीन वर्षात रस्ते विकासाच्या कामाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. आता हब्बनहट्टी-देवाचीहट्टी ते सीआरपीएफ कॅम्पपर्यंतच्या रस्त्यासाठी 2 कोटी 95 लाखांचा निधी मंजूर झाला असून यापुढील काळात जास्तीत जास्त रस्त्यांची मजबूत बांधणी होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी देवाचीहट्टी येथे हब्बनहट्टी ते तोराळी सीआरपीएफ कॅम्पपर्यंत रस्त्याच्या डांबरीकरण शुभारंभप्रसंगी दिली.
यावेळी त्या म्हणाल्या, बैलूर भागातील हब्बनहट्टी, देवाचीहट्टी, तोराळीबरोबरच बैलूर ते गोल्याळी उर्वरित 5 कि. मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी 5 कोटी रुपये मंजुरीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याचाही सातत्याने पाठपुरावा सुरू असून त्याही कामाला लवकरात लवकर मंजुरी मिळेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आगामी दोन महिन्यात जांबोटी पश्चिम भागातील खराब झालेल्या सर्व गावांच्या रस्त्यांचा विकास होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
बैलूर व्हाया देवाचीहट्टी ते तोराळी या सात कि.मी.पैकी स्वयंभू मारुती देवस्थान क्रॉस ते देवाचीहट्टीजवळील सीआरपीएफ केंद्रापर्यंत दोन कि.मी.च्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातून 2 कोटी 95 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे तालुका अभियंते बसवराज हलगी, विनायक आमशी, तोराळी सीआरपीएफ केंद्राचे डीआयजी रवींद्रन, ग्रा. पं. सदस्य प्रदीप कवठणकर, गंगाराम पाटील, सखाराम धुरी, सुनीता दंडगल, इर्शाद पठाण, पांडुरंग कवठणकर, मोतीराम गावडे, महादेव कालमणकर, दीपक कवठणकर, दुर्गाप्पा तळवार, लहू कवठणकर, संजय बामणे, मनोहर पाटील, कृष्णा बामणे यासह इतर गावकरी उपस्थित होते.