बेळगाव / प्रतिनिधी
शहरातील वाहतूक कोंडीचा भार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच सध्या शहरातील रस्त्यांच्या विकासकामामुळे आणखीच भर पडत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे शहरांतर्गत वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. वाढती वाहने, विकासकामे, रस्त्यांची खोदाई यामुळे वाहतूक कोंडी जटिल झाली आहे.
शनिवारी आरटीओ सर्कलजवळील रस्त्याचे काम हाती घेण्यात येत असल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. परिणामी इतर रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली होती. शहरातील मुख्य रस्त्यांची कामे सुरू असल्याने इतरत्र रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. रस्त्यांच्या कामासाठी काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य चौकांसह सिग्नलजवळ वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्यांची खोदाई करून काँंिक्रटीकरण करण्यात येत असल्याने काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे इच्छीत स्थळी पोहोचण्यासाठी वाहनधारकांना पर्यायी मार्ग शोधावे लागत आहेत. बेशिस्त वाहनचालक आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया काही वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून शिस्त लावण्याचा पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. पार्किंगला जागा नसल्यामुळे रस्त्यालगत लावलेल्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचा विळखा वाढत आहे.