प्रतिनिधी/ सातारा
आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम….महाराज…..गडपती…गजअश्वपती…भूपती…प्रजापती…सुवर्णरत्नश्रीपती..अष्टवधानजागृत…अष्टप्रधानवेष्टित…न्यायालंकारमंडित…शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत…राजनितिधुरंधर…प्रौढप्रतापपुरंदर..क्षत्रियकुलावतंस…सिंहासनाधिश्वर…महाराजाधिराज…राजाशिवछत्रपती…महाराजांचा विजय असो, अशा शिवगर्जनांनी पहाटेपासूनच राजधानीत वातावरण शिवमय झाले होते. भगवे फेटे घालून युवक, नऊवारी साडी नेसून युवती, महिला यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळय़ाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. गडावरुन शिवज्योत आणण्यासाठी शिवमंडळांची रांग लागली होती.
सातारा जिल्हाधिकाऱयांनी कोरोनाच्या अनुषंगाने शिवजयंतीला कलम 144 लागू केले होते. त्यामुळे शिवभक्तांना काय होईल ते होईल आपल्या राजाची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेत ठरलेल्या नियोजनानुसार गडकिल्यावरुन शिवज्योत आणायला शिवभक्त बाहेर पडले. त्यांना अनेक ठिकाणी पोलिसांनी रोखले. परंतु शिवभक्तांनी नाराजी व्यक्त करत मंडळाच्या ठिकाणी शिवज्योत पोहचवली. सातारा शहरात सकाळपासून वातावरण शिवमय झाले होते. शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या परिसराला विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. फुलांची आसार करण्यात आली होती. सकाळीच शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केलेली होती. सातारा शहरात गोडोली, मंगळवार पेठ, शाहुनगर यासह सर्वच ठिकाणी शिवजयंती चौकाचौकात साधेपणाने साजरी करण्यात आली.
अजिंक्यताऱयावर वातावरण शिवमय
किल्ले अजिंक्यताऱयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला यावर्षी झेंडूच्या फुलांनी सजवले होते. गडावर येणाऱया शिवभक्तांच्या स्वागतासाठी तुताऱयांचा निनादात गडावरील वातावरण शिवमय झाले होते. अनेक मंडळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती पालखीतून नेण्यात दंग होते.
पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी
साताऱयात शिवजयंतीला कलम 144 असल्याने ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक गडाच्या परिसरात पोलीस टेहळणी करत होते. येणाऱयाजाणाऱया शिवभक्तांनी कोरोनाच्या अनुषंगाने नियम पाळले की नाही याची माहिती घेत होते.
पालिकेच्यावतीने किल्यावर लेझर शो
सातारा पालिकेच्यावतीने यावर्षी कोरोनाच्या अनुषंगाने साधेपणाने शिवजयंतीचे नियोजन करण्यात आले होते. राजवाडा येथे पालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्या मूर्तीचे पूजन खासदार उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या मान्यवर उपस्थित होते. लेझर शो, तसेच पोवई नाक्यावर शिवतीर्थावर उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सर्व तयारी केली होती.