वृत्तसंस्था/ दुबई
आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील दुसऱया टप्प्यात येथे सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यातील सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होणार आहे. प्ले ऑफ गटातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी राजस्थान रॉयल्सच्या कर्णधार संजु सॅमसनला फलंदाजीमध्ये सहकार्याकडून साथ मिळणे जरूरीचे आहे.
स्पर्धेच्या ताज्या गुणतक्त्यामध्ये राजस्थान रॉयल्स संघाने 9 सामन्यांतून 8 गुणांसह पाचवे स्थान मिळविले आहे. दरम्यान हैद्राबाद संघाचे या स्पर्धेतील प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्याचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. हैद्राबाद संघाने 9 सामन्यात केवळ एक विजय मिळविला आहे. या स्पर्धेच्या दुसऱया टप्प्याला प्रारंभ झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा दोन धावांनी पराभव केला तर तत्पूर्वी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थानचा 33 धावांनी पराभव केला. हैद्राबाद संघाला या स्पर्धेच्या दुसऱया टप्प्यात पहिल्या सामन्यात दिल्ली संघाकडून आठ गडय़ांनी तर दुसऱया सामन्यात पंजाबकडून 5 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात राजस्थान रॉयल्सने हैद्राबादचा 55 धावांनी पराभव केला होता. दुसऱया टप्प्यातील झालेल्या दिल्लीविरूद्धच्या सामन्यात राजस्थानची गोलंदाजी अचूक झाल्याने दिल्लीला त्यांनी 154 धावांवर रोखले होते पण फलंदाजीत कर्णधार सॅमसनला त्याच्या साथीदारांकडून चांगली साथ मिळू शकली नाही. या सामन्यात सॅमसनने नाबाद 70 धावांची खेळी केली होती. राजस्थान संघातील सलामीचा जस्वाल, महिपाल लोमरोर, लिव्हिंगस्टोन आणि मिलर त्याचप्रमाणे अष्टपैलू पराग आणि तेवातिया यांच्याकडून कर्णधार सॅमसनला चांगली साथ मिळणे जरूरीचे आहे. राजस्थान संघातील गोलंदाज मुस्ताफिजुर रेहमान, कार्तिक त्यागी आणि चेतन साकारिया यांच्यावर गोलंदाजीची भिस्त राहील. शम्सी आणि तेवातिया हे फिरकी गोलंदाज आहेत. हैद्राबाद संघाचे या स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात हा संघ शेवटच्या स्थानावर आहे. आता या स्पर्धेतील उर्वरित सामने हे केवळ औपचारिका म्हणून राहतील. कर्णधार विलीयमसन, वॉर्नर आणि मनिष पांडे फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहेत.