प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या रोशनी आंतरराष्ट्रीय शॉर्टल्फिम फेस्टिव्हलमध्ये सावंतवाडीचे सुपुत्र संतोष बांदेकर दिग्दर्शित ‘राजा’ या दशावतारी कलाकाराच्या आयुष्यावर बनविण्यात आलेल्या चित्रपटाला नामांकन मिळाले. अंतिम स्पर्धेत हा लघुपट बाजी मारू शकला नसला, तरी जगभरातून आलेल्या 575 लघुपटांमधून या लघुपटाला मिळालेले हे नामांकन ही फार मोठी उपलब्धी समजली जाते.
दशावतारी कला सादर करणाऱया कलाकाराला ही कला जिवंत ठेवण्यासाठी त्याच्या वास्तव आयुष्यात कशाप्रकारे संघर्ष करावा लागतो, याचे अतिशय सुंदर असे कथानक या लघुपटाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. लेखक/दिग्दर्शक संतोष बांदेकर तसेच या लघुपटातील कलाकार मामा तेजम, कल्पना बांदेकर, कौस्तूभ बांदेकर, किशोर वाळके, नारायण लाड, शंकर वाळके, नंदू वाळके, किशोर सरनोबत, बाळा परब, केतन गोठोसकर, सुनील कदम, दीपक वाळके, नागेश नाईक, छायाचित्रण / संकलन / संगीत सागर बांदेकर, दादू सूद इत्यादी कलावंतांचा यात समावेश आहे.
गोठोससारख्या ग्रामीण भागातील तरुणांनी श्री भावई देवी नाटय़विश्व या संस्थेच्या माध्यमातून या लघुपटाची निर्मिती केली आहे. याचे सर्व चित्रिकरण हे गोठोस गावात व आजूबाजूच्या परिसरात करण्यात आले आहे. कोकणातील दशावतारी कलावंतांनी या लघुपटाला आपली पहिली पसंती दिली आहे. एकंदर या लघुपटाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झालेल्या निवडीबद्दल निर्माता, दिग्दर्शन व कलाकारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.