प्रतिनिधी/ वास्को
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर काल शनिवारी दुपारी गोवा भेटीवर दाखल झाले. हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर राजेंद्र आर्लेकर प्रथमच गोव्यात दाखल झाले आहेत. दाबोळी विमानतळावर शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो यांनी तसेच भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक यांनी राज्यपाल आर्लेकर यांच्या पहिल्या भेटीचे स्वागत केले.
राजेंद्र आर्लेकर यांचा 13 रोजी हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी शपथविधी झाला होता. 12 रोजी ते हिमाचल प्रदेशला रवाना झाले होते. राज्यपालपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर 12 दिवसांनी ते काल शनिवारी पुन्हा गोव्यात दाखल झाले. येत्या 28 रोजी ते पुन्हा हिमाचल प्रदेशला रवाना होणार आहेत.