2 कोटीतून उभारलेल्या रेंजमध्ये 72 लाखांची टारगेटस्, दररोज 300 जण घेणार नेमबाजीचे धडे
संग्राम काटकर / कोल्हापूर
क्रीडानगरी कोल्हापुरात आता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेमबाज सहज तयार होतील, अशी आधुनिक 10 मीटर एअर रायफलची रेंज दुधाळीतील महापालिकेच्या छत्रपती धर्मवीर संभाजीराजे एअर रायफल नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात तयार केली आहे. तब्बल 2 कोटी रूपये खर्चुन बनविलेली ही रेंज वातानुकूलीत आहे. इतकेच नव्हे तर साऊंडप्रुफ असलेली ही रेंज महाराष्ट्रातील एकमेव ठरली आहे. या रेंजमध्ये 72 लाख रूपये खर्चुन 15 मॅन्युअर टारगेट आणि 10 इलेक्ट्रॉनिक टारगेटस् बसवली आहेत. आता लवकरच महापालिकेकडील 20 एअर रायफल रेंजवर दाखल करून नेमबाजीच्या प्रशिक्षण सुरूवात केली जाणार आहेत.
माजी नगराध्यक्ष सखारामबापू खराडे, रायफल महर्षी जयसिंगराव कुसाळे व महापालिकेचे पहिले प्रशासक द्वारकानाथ कपूर यांनी दुधाळी मैदानानजिकच्या 4 एकर जागेत 1965 साली दुधाळी शुटींग रेंजची स्थापना केली. छत्रपती धर्मवीर संभाजीराजे एअर रायफल नेमबाजी प्रशिक्षण केंद्र असे नामकरण केले. याचबरोबर केंद्रात 50 मीटर रायफल व पिस्टल आणि 10 मीटर एअर रायफल आणि एअर पिस्टल या नेमजाबी प्रकारच्या रेंज बसविल्या. त्यामुळे नेमबाजीचे धडे घेण्यासाठी अनेकांची पाऊले रेंजकडे वळू लागली. मधल्या काळात रेंजवरील प्रशिक्षक अजित पाटील, युवराज साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले ऑलिंपिकवीर राही सरनोबत, तेजस्विनी सावंत यांच्यासह राधिका बराले, नवनाथ फरताडे, संदीप तरटे, आदींसह अनेक नेमबाजांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके मिळवून कोल्हापूरचे नाव जगाच्या पटलावर नेले.
महापालिका आणि कोल्हापूर डिस्ट्रीक्ट मेन ऍण्ड वुमन रायफल असोसिएशनने प्रगतीच्या दिशेने एक पाऊल टाकत 2014 साली शुटींग रेंजवर आधुनिक 10 मीटर एअर रायफल शूटिंग रेंजच्या उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तत्कालीन जिल्हाधिकारी अमित सैनी व माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांच्या प्रयत्नातून रेंज बांधणीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून 2 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला. महापालिकेने टेंडर प्रक्रिया करून 10 मीटर एअर रायफल रेंजच्या बांधकामाला सुरूवातही केली. निधी मिळण्यातील चांगले वाईट अनुभव घेत 2018 ला रेंजचे बांधकाम पूर्ण केले. पण पुढील दीड वर्षे टारगेटस् न मिळाल्याने रेंज धूळ खात पडली. कोरोना येण्यापूर्वी 72 लाख रूपयांचे 13 मॅन्युअर टारगेट आणि 10 इलेक्ट्रॉनिक टारगेटची ऑर्डर दिली. मात्र याचवेळी कोरोनाचा शिरकाव झाल्याने टारगेटस् रेंजवर बसवता आली नाहीत. तीन महिन्यांपूर्वी रेंजवर टारगेटस् बसवून चाचण्याही घेतल्या. सध्या रेंज सर्व बाजूंनी तयार असून लवकरच प्रतिदिन 300 मुले-मुली नेमबाजीचे धडे घेतील, अशा बॅचेस तयार केल्या जाणार आहेत.
नव्या शुटींग रेंजचे सोमवारी उद्घाटन…
दुधाळी शुटींग रेंजवर तयार केलेल्या 10 मीटर एअर रायफल शुटींग रेंजचे सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी मंत्री पाटील यांच्याकडे रेंजसाठी 10 एअर रायफल मिळाव्यात, अशी मागणी करणार असल्याचे कोल्हापूर डिस्ट्रीक्ट मेन ऍण्ड वुमन रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अजित खराडे यांनी सांगितले.