उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांची माहिती : जमखंडीत 100 खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन
वार्ताहर / जमखंडी
शिशू व मातांना 24 तास आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू केले आहे. या योजनेंतर्गत कर्नाटक राज्यात सर्व सुविधांयुक्त 75 रुग्णालये उभारण्यात येत आहेत. सामान्य जनतेला जनऔषधी केंद्रातून माफक दरात औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी केले. येथे 100 खाटांच्या रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत हाते.
कार्जोळ पुढे म्हणाले, जमखंडीतील सरकारी रुग्णालय परिसरात 20 कोटीहून अधिक अनुदानातून 100 खाटांचे इस्पितळ व कर्मचारी वसतिगृह (एमसीएच) निर्माण करण्यात येणार आहे. येथे 24 तास वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार आहे. बदामी व मुधोळ येथे प्रत्येकी 1 कोटी खर्चातून तालुका आरोग्य कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या परिसरातील एचआयव्ही रुग्णांसाठी मुधोळ येथे एआरटी केंद्र कार्यान्वित केले आहे. 48 प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी 4 लाख, 120 ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी 3 लाख 25 हजार रुपये मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. समारंभाच्या दिव्य सान्निध्यपदी मुत्तीनकंती मठाचे शिवलिंग पंडिताराध्य शिवाचार्य उपस्थित होते. यावेळी तेरदाळचे आमदार सिद्दू सवदी, जि. पं. उपाध्यक्ष मुत्तप्पा कोमार, ता. पं. अध्यक्षा सविता कल्याणी, उपाध्यक्षा सुंद्रव्वा बेळगली आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष सिद्दू मिशी, उपनगराध्यक्षा मल्लव्वा पायगोंड माजी विधान परिषद सदस्य जी. एस. न्यामगौड, अरुणकुमार शहा, फकिरसाब बागवान, राजू पिसाळ, प्रांताधिकारी डॉ. सिद्दू हुल्लोळ्ळी, तहसीलदार एस. बी. इंगळे, डॉ. के. आर. बण्णद, अभियंते एम. एम. कट्टीमनी, जी. जी. जाधव आदी उपस्थित होते. सुरेश बिरादार यांनी नाडगीत सादर केले. डॉ. ए. एन. देसाई यांनी स्वागत केले.